Marathi Actress Pooja Sawant : महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे घराघरांत पूजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. नुकताच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आंबट शौकीन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी पूजाने तिला आलेल्या हटके प्रपोजलचा अनुभव सांगितला. यासाठी पूजाला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा अभिनेत्रीने ‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

पूजा सावंत सांगते, “आम्ही आधी वडाळ्याला राहायचो. माझी शाळा, कॉलेज सगळं शिक्षण तिथेच राहत असताना पूर्ण झालं. त्यानंतर विलेपार्ले आणि आता आम्ही गोरेगावला राहायला आलो. एके दिवशी अचानक मला वडाळा पोलीस स्टेशनमधून फोन आला. ते म्हणाले, तुमच्या नावावर तक्रार दाखल झालीये, हा तुमच्या घराचा आधीचा पत्ता होता का? तुम्हाला यावं लागेल.”

याबद्दल समजल्यावर पूजाने आपल्या वडिलांना फोन करून याबाबत कल्पना दिली होती. ती म्हणाली, “मग मी माझ्या पप्पांना फोन केला. त्यांना सगळं सांगितलं…आणि कोणती तक्रार वगैरे मला काहीच माहिती नव्हतं. पप्पा मला म्हणाले तू काहीच नको करुस, मी बघतो त्यांनी चौकशी केल्यावर समजलं खरंच एक तक्रार दाखल करण्यात आली होती.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी, पप्पा, माझा भाऊ आणि बहीण आम्ही चौघं मिळून वडाळा पोलीस स्टेशनला गेलो होतो. मी पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला गेले होते, मला माहिती नाही का…पण, मी अशी उत्साही झाले होते. नेमकं काय झालं असेल वगैरे…तिकडे गेल्यावर मला असं समजलं. ज्याच्याशी माझा काहीच संबंध नव्हता अशा एका व्यक्तीने माझ्या नावे तक्रार लिहिली होती. त्या व्यक्तीने लिहिलं होतं की, मी हिच्या वडिलांना ओळखतो…त्यांनी मला प्रॉमिस केलेलं की ते पूजाचं लग्न माझ्याशी लावून देतील. त्या माणसाची संपूर्ण माहिती तिथे देण्यात आली होती. आम्ही त्याला ओळखतच नव्हतो. बरं आम्ही ज्या कॉलनीत राहत होतो, तिथेही त्याला कधीच पाहिलं नव्हतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पोलिसांना सुद्धा लगेच समजलं की हे सगळं बनावट आहे. त्यांनी प्रचंड मदत केली, ते म्हणाले की, आता तुम्हाला इथे येण्याची पण गरज नाही आम्ही बघतो काय करायचं. खरंच हा अगदी वेगळा आणि विचित्र अनुभव मला आला होता पण, या सगळ्यात मुंबई पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं होतं.” असं सांगत पूजा सावंतने पोलिसांचे आभार मानले.