Fandry Fame Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटामुळे शालू अन् जब्याची जोडी महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. ‘फँड्री’ सिनेमा प्रदर्शित होऊन आता जवळपास १२ वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही या दोघांची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमात शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरातने साकारली होती.
राजेश्वरी कधी धर्मांतरावरून तर, कधी जब्याबरोबर ( सोमनाथ अवघडे ) शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींबद्दल स्पष्ट मतं मांडली. तसेच यावेळी तिने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सुद्धा सांगितला.
इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवाविषयी सांगताना राजेश्वरी खरात म्हणाली, “हो, मला असा अनुभव आला आहे. मला ताईंनी ( गार्गी – नागराज मंजुळे यांच्या पत्नी ) याची पूर्वकल्पना आधीच दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, इंडस्ट्रीत असं सगळं होण्याची शक्यता असते. लोक कुठपर्यंत जाऊ शकतात, काय-काय विचारू शकतात? या सगळ्या गोष्टी त्यांनी मला आधीच सांगितल्या होत्या आणि यासाठी आपण स्वत: खंबीर राहिलं पाहिजे असंही त्यांनी मला सांगितलं होतं.”
राजेश्वरी पुढे म्हणाली, “आता मी कोणाचं नाव घेणार नाही. पण, मला एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. त्यावेळी मी दुसऱ्या एका स्क्रिप्टच्या रिहर्सलसाठी गेले होते. ते मला फोन करून म्हणाले, ‘तू आता कुठे आहेस?’ यावर मी त्यांना सांगितलं की, दुसऱ्या एका प्रोजेक्टच्या रिहर्सलसाठी आले आहे. त्यांनी मला पुन्हा विचारलं, ‘तुला किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये.’ मी त्यांना सांगितलं आता येऊ शकणार नाही…मला वेळ लागेल.”
“अचानक फोन करून मला बोलावून घेत आहेत याचं काय कारण असावं… म्हणून मी त्यांना विचारलं, ‘काय काम आहे? काय झालं?’ यावर ते समोरून म्हणाले, ‘तू मला विचारायचं नाही काय काम आहे? मी सांगितल्यावर तू इथे आली पाहिजेस.’ हे ऐकताच मी त्या क्षणी रडायला लागले. त्यावेळी मग मला एका सरांनी समजावलं. अशा गोष्टी होत राहतात…पुढे त्यानंतर कधीच मी त्या दिग्दर्शकाचा फोन उचलला नाही. ‘मी सांगितल्यावर तू इथे आलीच पाहिजेस’ हे असं बोलणं अतिशय चुकीचं आहे. कॉम्प्रोमाइजसाठीही अनेकदा विचारणा झालेली आहे. मी तेव्हा थेट सांगितलं होतं, मला असलं काही विचारायचं नाही, मी असलं काही करत नाही. मुळात हे लोक आता अजिबात घाबरत नाहीत. खरंच हे सगळं अतिशय चुकीचं आहे.” असं राजेश्वरीने सांगितलं.