Renuka Shahane is Atheist : बॉलीवूडबरोबरच मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे होय. रेणुका सध्या त्यांच्या ‘देवमाणूस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी नास्तिक असल्याचं सांगितलं.
रेणुका शहाणे यांनी त्यांच्या पिढ्या न पिढ्या नास्तिक असल्याचं विधान केलं आहे. फिव्हर पुणेला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या, “मी तर पूर्णपणे नास्तिक आहे. म्हणजे पिढ्या न पिढ्या आमच्या नास्तिक आहेत. आमच्या घरात कोणीही देवपूजक नव्हते.”
आमच्याकडे संतांचे फोटो असतात, कारण… – रेणुका शहाणे
“मी माझ्या आजीकडेच लहानाची मोठी झाले आणि तिच्याकडे वारकरी संप्रदायाला मानतात. त्यामुळे घरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचे फोटो आहेत. सर्वसाधारण सगळीकडे घरात देवांचे फोटो असतात पण आमच्याकडे संतांचे असतात. कारण देव चराचरात आहे..! आपल्यामध्ये, सगळीकडेच देव आहे, कुठली एक जागा नाही अनु, रेणू नाही जिथे देव नाही! देव एका जागेत नाही, तो प्रत्येकात आहे. त्यामुळे देवासाठी खास विधी करणं किंवा दाखवणं मला गरजेचं वाटत नाही,” असं रेणुका शहाणे म्हणाल्या.
दरम्यान, ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’कडून बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळतेय.