रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करणार आहे. आता अशात रितेशने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.

रितेशने नुकतंच एक इन्स्टाग्राम लाईव्ह केलं. या लाईव्ह सेशनमध्ये त्याने चित्रपटाचं शूटिंग करताना घडलेल्या काही गमतीजमती शेअर केल्या. या चित्रपटातील सत्या आणि श्रावणी यांचा शेवटचा सीन रेल्वे स्टेशनवर शूट केला गेला आहे. परंतु हा सीन शूट करताना त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. तसंच या सीनमध्ये त्यांना काही बदलही करावे लागल्याचं रितेशने सांगितलं.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

रितेश म्हणाला, “या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये माझी दाढी आहे तर काही सीन्स मी दाढी करून शूट केले. आधी मी दाढी वाढवली मग चित्रपटाच्या उत्तरार्धाचं चित्रीकरण केलं. मग पुन्हा दाढी केली आणि मग आम्ही पूर्वार्ध शूट केला. या चित्रपटातील शेवटचा सीन आम्हाला रेल्वे स्टेशनवर शूट करायचा होता. पण त्यात लॉकडाउन लागलं. त्यामुळे आम्ही नंतर जेव्हा तुमच्याकडे परवानगी मागायला गेलो तेव्हा रेल्वे प्रशाशनाने सांगितलं की तुम्ही १० माणसं घेऊन चित्रीकरण करू शकता. आता एका सीनसाठी साधारण १००-११० माणसं काम करत असतात. त्यामुळे फक्त १० माणसांमध्ये चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी ते रद्द केलं.”

पुढे तो म्हणाला, ” दरम्यानच्या काळात मी परदेशात गेलो. तिथे एका चित्रपटाचे शूटिंग केलं आणि पुन्हा इथे आल्यावर दाढी वाढवली आणि लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा हा शेवटचा सीन शूट करायला लागला. जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो तेव्हा स्टेशनवर मालगाडी येऊन थांबली होती. ती मालगाडी आम्हाला नको होती. त्याबाबत आम्ही तेथील रेल्वे कार्यालयात विचारणा केली असता ते म्हणाले की, पुढे प्लॅटफॉर्मचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी ५ तास हलणार नाही. आता आम्ही तेवढा वेळ वाट पाहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही सगळा सीन शूट केला. मग मला वाटायला लागलं की लोक विचारतील, श्रावणी याला सोडून चाललीये मग ती मालगाडीसाठी का वाट बघतेय? मग आम्हाला “थांबावंच लागेल मालगाडी आहे ना” हा संवाद टाकावा लागला.”

हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘वेड’ या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली. एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला.