मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी गेली अनेक दशके प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. मराठीप्रमाणेच सचिन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘बालिका वधू’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.
‘बालिका वधू’ चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटातील “बडे अच्छे लगते है” हे गाणं आजंही कित्येकांच्या ओठी असतं. सचिन पिळगावकर यांनी नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या गर्दीत हे गाणं गायलं. याचा व्हिडीओ सचिन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
सचिन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या गर्दीत मंचावर उभं राहून “बडे अच्छे लगते है” हे गाणं ते गाताना दिसत आहे. त्यांच्याबरोबर प्रेक्षकांनीही या गाण्यावर ताल धरलेला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “आजची पिढीदेखील या गाण्याशी कनेक्ट होत आहे, हे पाहून आनंद होतोय” असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.
सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘महागुरू’ अशी ओळख मिळवणाऱ्या सचिन यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.