हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना त्या गर्दीतच हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटातही पुन्हा दमदार अभिनेत्रींची तीच गँग लोकांना पाहायला मिळाली. अजूनही काही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’चे शोज सुरू आहेत. या चित्रपटातील अभिनेत्रींबरोबरच यातील अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचंही भरपुर कौतुक होत आहे.

२०२३ हे वर्षं संपत आलं आहे आणि अशातच २०२४ मध्ये नेमके कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे वेध लागलेले आहेत. अशातच ‘झिम्मा २’च्या यशानंतर नवीन वर्षात येणाऱ्या आपल्या दुसऱ्या चित्रपटाचीही सिद्धार्थने घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने त्याच्या आगामी ‘ओले आले’ या चित्रपटाची घोषणा केली होती. आता त्यानंतर पुन्हा एका नव्या ढंगात सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आणखी वाचा : शर्मिला टागोर यांनी नाकारलेली ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘ती’ भूमिका; म्हणाल्या, “कॅन्सरनंतर…”

नुकतंच सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘श्रीदेवी प्रसन्न’. नावच काहीसं आगळं वेगळं असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसह बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरही झळकणार आहे. सई आणि सिद्धार्थ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोस्टरवरून तरी ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट श्रीदेवी नावाची मुलगी अन् प्रसन्न नावाच्या मुलाची लव्ह स्टोरी यावर बेतलेला असणार हे निश्चित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक भन्नाट आणि फ्रेश जोडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या आगळ्या वेगळ्या लव्ह स्टोरीची लोक आतुरतेने वाट बघत आहेत असं बऱ्याच चाहत्यांनी कॉमेंटमध्येही लिहिलं आहे. या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. २ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.