सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ-मिताली त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करतात. अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकारांना सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु, सिद्धार्थ-मितालीने अशा बऱ्याच ट्रोलर्सची कमेंट सेक्शनमध्ये स्पष्ट उत्तर देत बोलती बंद केल्याचं आपण यापूर्वी अनेकदा पाहिलं आहे. सिद्धार्थ सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याने नुकतीच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थने अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

सिद्धार्थ चांदेकर कमेंट्स सेक्शनमध्ये नेटकऱ्यांच्या विचित्र प्रश्नांना अनेकदा स्पष्ट शब्दात उत्तर देत असतो. याविषयी अभिनेत्याला विचारलं असता तो म्हणाला, “जर कोणी कमेंट्समध्ये आपली चेष्टा करत असेल, तर आपणही तसंच बोलायचं. जे लोक अपमान करतात त्याला फार मनावर घ्यायचं नाही सरळ दुर्लक्ष करायचं. हे एवढं सोपं आहे. जे लोक आपल्या कमेंट्समध्ये उलटं सुलटं बोलतात ते जास्त गांभीर्याने घ्यायची गरजच नसते. कारण, त्यांना वास्तव परिस्थिती माहितीच नसते. म्हणूनच फोटो किंवा व्हिडीओवर येणाऱ्या कमेंट्सला आता आम्ही तेवढं महत्त्व देत नाही. जे वाटतंय ते उत्तर देऊन मोकळे होतो.”

हेही वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटासाठी हेमांगी कवीची भलीमोठी पोस्ट, दिग्दर्शक हेमंत ढोमेला केली खास विनंती; म्हणाली, “आता हा खेळ…”

‘झिम्मा २’चा दिग्दर्शक हेमंत याविषयी म्हणाला, “मध्यंतरी सिद्धार्थ-मितालीच्या व्हिडीओवर ‘पंखे साफ केले नाहीत का?’ अशी कमेंट होती. मुळात त्यांच्या घरी मी अनेकदा गेलो आहे त्यामुळे मला माहितीये की, त्या पंख्याचा रंग तसाच आहे. पण, लोकं असं काहीतरी विचारतात मग, सिद्धार्थने त्यावर फार छान उत्तर देत ‘मग कधी येताय पुसायला’ असं म्हटलं होतं. यावर सिद्धार्थ म्हणाला, “त्यांना अशीच उत्तरं द्यावी लागतात… मी त्यांना पंख्याचा रंग तसाच आहे वगैरे कुठे स्पष्टीकरण देणार… त्यापेक्षा वाईट दिसतंय, तर या पुसायला असं सांगितलं. “

हेही वाचा : Video : निवेदिता सराफ यांचं आवडतं पर्यटनस्थळ कोणतं? अशोक मामांचं उत्तर ऐकून भर कार्यक्रमात पिकला एकच हशा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झिम्मा २’ चित्रपटाविषयी सांगायचं झालं, तर २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आठवड्याभरात चांगली कमाई केली आहे. गेल्या ७ दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरुने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.