Sulochana Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं रविवारी(४ जून) प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

सुलोचना दीदीं यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेते व मराठी कलाविश्वातील कलाकारांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सुलोचना दीदींना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली.

“सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा, ही आम्हा सगळ्यांची इच्छा होती. परंतु महाराष्ट्रासाठी कदाचित दिल्ली लांब पडत असेल आणि असं म्हणतात की वरती ओळख असली पाहिजे. पण मराठी कलाकारांना त्याची गरज नाही आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मागून मिळाला तर तो सन्मान कसा असू शकतो? परंतु तरीही दीदींना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं सचिन पिळगावकर म्हणाले.

हेही वाचा>> “एक असामान्य व्यक्तीमत्त्व हरपले” सुलोचना दीदींच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्वीट, म्हणाले…

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुलोचना दीदी यांनी दिलेलं योगदान अमुल्य आहे. सुलोचना लाटकर यांची सुलोचना दीदी या नावानेच कलाक्षेत्रामध्ये ओळख होती. सुलोचना दीदींची कारकीर्द कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली. चित्रपटाआधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल टाकलं. हा प्रयोग शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही केलेलं काम उल्लेखनीय आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील बाबुराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुलोचना दीदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता. सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापुरात ‘मोलकरीण’, ‘वहिनींच्या बांगड्या’, ‘मिठभाकर’, ‘धाकटी जाऊ’ असे चित्रपट केले.