नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे आज महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीने सुरुवातीच्या काळात फार संघर्ष करून चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया पाठारे यांनी आपला प्रवास व संघर्ष उलगडला आहे.
बालपण, बेताची परिस्थिती याबद्दल सांगताना सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “गरिबीतून श्रीमंतीकडे जाणं वेगळं पण, श्रीमंतीत असताना अचानक गरिबीचे दिवस येतात तेव्हा सगळ्या गोष्टी फारच त्रासदायक होतात. वडिलांचं सगळं गेल्यावर माझ्या आईने अगदी कमरेला कसून आम्हा सर्वांना मोठं केलं. तेव्हा माझी आई १८ घरी गरोदर बायकांना मॉलिश करण्याची कामं करायची. याशिवाय जवळपास १८ ते २० घरची भांडी-कपड्यांची कामं ती करायची. घरात मी मोठी असल्याने आईच्या मदतीसाठी उभं राहणं हे स्वाभाविक होतं. त्यामुळे मी सुद्धा तिला मदत करायचे.”
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीत बसताच ‘हा’ बॉलीवूड अभिनेता झाला सारथी; व्हिडीओ व्हायरल
सुप्रिया पुढे म्हणाल्या, “त्या काळात कडक पाव मिळायचे. माझी आई कधीतरी ते दोन पाव घेऊन यायची. तेव्हा आम्हाला चौघा भावंडांमध्ये मिळून ते पाव खावे लागायचे. एक अख्खा पाव क्वचित मिळायचा. पण, थोडे पैसे आल्यावर आईने आम्हाला खाण्या-पिण्याच्या बाबातीत काहीच कमी पडू दिलं नाही. बाकी कपडालत्ता घेण्यासाठी पैसेच नव्हते. या इंडस्ट्रीत यायचं वगैरे माझ्या काहीच डोक्यात नव्हतं. मला पोलीस अधिकारी वगैरे होण्याची इच्छा होती. पण, इयत्ता नववीपासून मी या इंडस्ट्रीत आल्यामुळे पुढे शिक्षणाचं सगळंच बारगळलं. पुढे, नववीनंतर आम्ही कुर्ल्याच्या ट्रान्सिस्ट कॅम्पमध्ये शिफ्ट झालो. तिथे भयंकर त्रास झाला, अगदी विचित्र मुलं होती. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मी माझं शिक्षण चालू ठेवलं. त्यानंतर शाळेत बाईंमुळे नाटकात काम करण्याची संधी मिळाली. दहावीत असताना मी भयंकर आजारी पडले होते. मला टाइफाइड झाला होता. त्यावेळी आईने मला मैत्रिणीच्या घरी राहायला ठेवलं होतं. कसेबसे मी सगळे पेपर दिले आणि ४७ टक्क्यांनी पास झाले. शाळेत असताना एका जवळच्या मैत्रिणीकडे मी घरकाम करायचे. तिच्या आईने निकाल लागल्यावर मला शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले होते. त्यावेळी माझा पगार शंभर रुपये होता.”
हेही वाचा : सलमान खानच्या ईद पार्टीला जिनिलीया देशमुखची उपस्थिती, भाईजानच्या बहिणीबरोबर शेअर केला खास फोटो
“शाळा संपल्यावर हळुहळू मी नाटकाकडे वळले तेव्हा मला प्रयोगासाठी पहिल्यांदा १५० रुपये मिळाले होते. ती माझी पहिली कमाई होती. गणपतीचे दिवस असल्याने बरेच प्रयोग झाले आणि माझ्या हातात पहिल्यांदाच सातशे ते आठशे रुपये आले. त्यावेळी ते पैसे खूप वाटायचे आणि आईला मी पाचशे रुपये दिले होते. आईचं नेहमी म्हणणं नोकरी कर, लग्न कर असंच होतं. पण, मी काहीतरी वेगळं करावं अशी माझ्या बाबांची इच्छा होती.” असं सुप्रिया पाठारेंनी सांगितलं.
दरम्यान, या संघर्षमय काळावर मात करत हळुहळू अभिनेत्रीचे दिवस पालटले. अहोरात्र मेहनत करून आज त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सुप्रिया पाठारे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साधी माणसं’ मालिकेत भूमिका साकारत आहेत. याशिवाय १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटात त्या प्रमुख भूमिका साकारणार आहेत.