Zapuk Zupuk Movie new song release: सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपुक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रितेश देशमुखसह अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सूरज चव्हाणचा रोमँटिक अंदाज

आता झापुक झापुक या सिनेमातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सूरज चव्हाणने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवरून हे गाणे शेअर केले आहे. या गाण्यात त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यात जुई भागवतदेखील दिसत आहे. या गाण्यात सूरजचा गाजलेला एक डायलॉगदेखील पाहायला मिळत आहे. ‘पोराचा बाजार उठला रं’ असे या गाण्याचे नाव आहे. गाण्यामध्ये या परिसरातील निसर्ग दिसत आहे. गावाकडचा सेटअप आणि लहान मुलेदेखील दिसत आहेत. करण सावंत यांनी हे गाणे गायले असून, कुणाल भगतने ते गाणे संगीतबद्ध केले आहे.

हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना सूरज चव्हाणने दिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. त्याने लिहिले, “हॅलो माइक चेक गोलीगत, सर्वांना एक जब्बर ब्रेकिंग बातमी द्यायची आहे. प्रेमात पडलेल्या आणि ज्यांचा ज्यांचा बाजार उठलाय त्या सर्वांसाठी झापुक झुपुक या चित्रपटातील नवीन गाणं आलं आहे.” पुढे त्याने कुणाल भगतला टॅग करीत लिहिलेय की, आपल्या दाजींनी गाणं बनवलं आहे. तर, करण सावंत यांना टॅग करीत लिहिलेय की, त्यांनी पोरांचा बाजार उठला रं हे गाणं गायलं आहे.” या गाण्यात जुई व सूरजचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. सूरजने शेअर केलेल्या या गाण्यावर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

झापुक झुपुक या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्याबरोबरच इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सूरजचे निरागस आणि रौद्र अशी दोन्ही रूपे ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरला. या शोमध्ये अंकिता वालावलकरदेखील सहभागी झाले होती. त्यांच्यातील बहीण-भावाच्या नात्याचे सर्वांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. कुणाल भगत हा अंकिताचा नवरा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूरज चव्हाणने कुणालला दाजी, असे म्हटल्याचे दिसत आहे. झापुक झुपुक चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अंकिता वालावलकरने हजेरी लावली होती. दरम्यान, बिग बॉसप्रमाणेच सूरजला त्याच्या चित्रपटासाठीदेखील प्रेम मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.