मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी ही मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रीय आहेत. राजकारणात सक्रीय राहून ते अनेक समाजोपयोगी कामे करताना दिसतात. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील काही समस्या सरकार दरबारी घेऊन जाण्याचे प्रयत्न करतात. असाच मनोरंजन क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारा मराठी अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. त्याने आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांमधून महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत आणि त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मालिका व चित्रपटांबरोबरच सुशांतने ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही सहभाग घेतला होता आणि या शोमुळे त्याच्या प्रसिद्धीत आणखीनच वाढ झाली. मालिका, चित्रपट शिवाय रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सुशांतने राजकारणात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्याचा अभिनयातला वावर कमी झाला असला तरीही राजकारणात मात्र तो बराच सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तो बरेचदा एकनाथ शिंदे यांचा प्रचार करताना सुद्धा दिसला आहे. याशिवाय तो शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे.

अशातच सुशांतने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरील कामाचा अनुभव शेअर केला आहे. सुशांत व त्याच्या पत्नीने नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. या संवादात त्याने वडील गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याची इच्छा पूर्ण केल्याचं सांगितलं. याबद्दल तो म्हणाला की, “२६ व्या वर्षी माझं लग्न झालं. २७ व्या वर्षी माझे वडील गेले आणि त्यानंतर २८ व्या वर्षी मी बाबा झालो. त्यामुळे त्यानंतर मला कोणाकडे काही मागणं हे माहीतच नाही. कारण माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या होत्या की, त्या पूर्ण करणं ही मोठी जबाबदारी होती.”

यापुढे सुशांत म्हणाला की, “आई, पत्नी मुलगी यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे वडील गेल्यानंतर आयुष्यात काही मागायचं झालं, तर ते मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मागितलं आणि ती जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. त्यामुळे वडिलांनंतर कुणाकडे काही मागितलं असेल तर ते एकनाथ शिंदेंकडे मागितलं आणि माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. त्यामुळे ही आयुष्यातील एक मोठी गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सुशांतने राजकारणातील भूमिकेबद्दल असं म्हटलं की, “शाळेत असल्यापासून मला नेतृत्व करण्याची हौस आहे. त्यामुळे समाजासाठी काही तरी करता यावं हे मला कायमच वाटत होतं. त्यामुळे माझी ही हौस पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करत आहे.” दरम्यान, सुशांतने ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मॅटर’, ‘खारी बिस्किट’, ‘तुला कळणार नाही’, ‘धर्मवीर’ अशा काही चित्रपटांतून तसेच ‘ह्या गोजिरवाण्या घरात’सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.