Treesha Thosar Favourite Actor : बालकलाकार त्रिशा ठोसरला ‘नाळ २’ सिनेमासाठी नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अवघ्या ६ वर्षांची त्रिशा या सोहळ्याला साडी नेसून गेली होती. त्रिशाच्या चेहऱ्यावरची निरागसता, तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच भारावून गेले होते. या सोहळ्यादरम्यानचे त्रिशाचे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता ही चिमुकली महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात झळकणार आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने या सिनेमाच्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्रिशाला, “राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आले होते त्यांना तू भेटलीस का?” असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर त्रिशा म्हणाली, “हो! मी त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर फोटो सुद्धा काढले. राणी मुखर्जी मॅम, मोहनलाल सर, शाहरुख खान सर, विक्रांत मॅसी सर…विक्रांत सर माझ्या आईचे फेव्हेरेट अभिनेते आहेत.”

यावर त्रिशाला तुझे फेव्हेरट अभिनेते कोण आहेत? असा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकताच त्रिशाने लगेच ‘रितेश देशमुख’चं नाव घेतलं. तिचं उत्तर ऐकून उपस्थित सगळेजण फार खूश झाले. यावर “याला म्हणतात मराठी बाणा!” असं म्हणत महेश मांजरेकरांनी त्रिशाचं कौतुक केलं.

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा मराठी सिनेविश्वातील बालकलाकारांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा रजत कमळ पुरस्कार यंदा ‘जिप्सी’ या मराठी चित्रपटासाठी कबीर खंदारे याला आणि ‘नाळ २’साठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना विभागून प्रदान करण्यात आला. यांच्यात त्रिशा वयाने सर्वात लहान आहे. त्यामुळे या सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाला या चिमुकलीचा खूप अभिमान वाटत होता.

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला त्रिशा ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसून गेली होती. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा या चिमुकलीची कौतुकाने पाठ थोपटली आणि त्रिशाला यंदाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.