राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांची सध्या मराठीपासून बॉलीवूडपर्यंत चर्चा आहे. ‘ॲनिमल’ सिनेमात फ्रेडी पाटील या भूमिकेतून देशभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. ‘मडगाव एक्स्प्रेस’ सिनेमात सुद्धा त्यांनी केलेल्या गँगस्टरच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या भारदस्त आवाजात आणि उर्जेसह त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावतात. उपेंद्र लिमये यांनी त्यांच्या नेहमीच्याच सळसळत्या उर्जेसह पुण्यात गणपती विसर्जनावेळी ताशा वाजवला आहे.

पुण्यातील मानाचे गणपती, त्यांच्यासह इतर गणेश विसर्जन मिरवणुका म्हणजे पर्वणीच असते. त्यातही ढोल पथक, त्यात वाजणारे पुणेरी ढोल यांची भुरळ अनेकदा सेलिब्रिटींनाही असते. काही कलावंत वादनाचा सराव करून ढोल-ताशा पथकात वादन करतात, तर काही कलावंत हे थेट ढोल-ताशांचा आवाज ऐकून त्या वातावरणात तल्लीन होऊन वादन करतात. पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक २८ तास चालली. याच मिरवणुकीत अभिनेते उपेंद्र लिमये यांनी डोक्याला गुलाल लावून ताशा वादन केलं.

हेही वाचा…नवरा माझा नवसाचा २ : लोकसत्ताचं Quiz सोडवा आणि चित्रपटही पाहा, सचिन पिळगांवकरांनी केलं आवाहन

उपेंद्र लिमये यांनी त्यांच्या वादनाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून अल्पावधीतच त्याला चाहत्यांकडून अनेक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओत उपेंद्र लिमये हे डोक्याला गुलाल लावून, हातात वादनाच्या काठ्या घेऊन ताशा पकडलेल्या व्यक्तीकडे जातात आणि बाकी ढोल आणि ताशांच्या साथीने वादन सुरू करतात. हे वादन करताना उपेंद्र लिमये अगदी तल्लीन होऊन वादन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना उपेंद्र लिमये यांनी कॅप्शन लिहिलं आहे. यात उपेंद्र लिमये लिहितात, “पुण्यातील मिरवणुकीत गुलालाच्या आणि ताशाच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप!! गणपती बाप्पा मोरया!!”

या व्हिडीओवर उपेंद्र यांच्या चाहत्यांनी कमेंट करून त्यांचं कौतुक केलं आहे. एक चाहता लिहितो, “उपेंद्र लिमये हे मातीतले कलाकार आहेत”, “नाद त्यांच्या रक्तातच आहे,” अशा आशयाची कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर आणखी एका युजरने “फायर है तू, फायर!” असं म्हणत उपेंद्र लिमये यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा…“तुझ्यासारखं व्यक्त होता येत नसलं तरी…”, प्रिया बापटच्या वाढदिवशी पती उमेशची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपेंद्र लिमये यांनी ‘ॲनिमल’च्या पहिल्या भागात काम केलं होतं. आता या सिनेमाचा ‘ॲनिमल पार्क’ हा दुसरा भाग येणार आहे. या दुसऱ्या भागात उपेंद्र लिमये यांची फ्रेडी पाटील ही भूमिका असणार की नाही, याबद्दल चाहत्यांमध्ये बरीच चर्चा आहे. उपेंद्र यांची भूमिका असलेला ‘मडगाव एक्स्प्रेस’ हा सिनेमा जिथे संपला आहे, तिथूनच पुढचा भाग येण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे या चित्रपटातील उपेंद्र यांचा ‘मेंडोझा भाई’ आणि छाया कदम यांची ‘कंचन कोंबडी’ ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळणार का, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.