९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची लोकप्रियता आजही कायम आहे. सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ‘माई’ हे पात्र साकारत आहे. अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करूनही वर्षा यांनी त्यांचा फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. आजवर त्यांनी सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर कामं केली आहेत. याशिवाय त्यांना दाक्षिणात्य चित्रपटसाठी देखील विचारणा झाली होती. याबद्दल लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे.

वर्षा उसगांवकर यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याकाळी वर्षा यांचं उल्लेखनीय काम पाहून त्यांना दक्षिणेतील एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता. यावेळी नेमकं काय घडलं याबाबतचा किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे. वर्षा म्हणाल्या, “‘गंमत जंमत’ प्रदर्शित झाल्यावर मला कन्नड चित्रपटसृष्टीतील निर्माते भेटायला आले होते. त्या चित्रपटाचं नाव ‘अर्जुन’ असं होतं. त्यावेळी सुपरस्टार अंबरीश यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळाली होती. ते आता हयात नाही. त्या चित्रपटात ज्या मुलीचं पात्र मी साकारणार होते ती नॉर्थ इंडियन होती.”

हेही वाचा : Video : छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून साताऱ्यातील शिवतीर्थावर पोहोचले अभिजीत बिचुकले, पाहा व्हिडीओ

वर्षा पुढे म्हणाल्या, “तेव्हा मला ते बेबी बोलायचे. ‘बेबी तुमको थोडा जाडा होना मंगता हैं’ असं मला ते नेहमी सांगायचे. कारण, त्यावेळी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री फार धष्टपुष्ट असायच्या. त्या चित्रपटासाठी माझं फोटोशूट झालं आणि आम्ही त्याठिकाणी शूटिंगला पोहोचलो. त्यात माझं अंबरीशबरोबर टू पिस म्हणजेच स्विमिंग सूट घालून एक गाणं होतं. ते ऐकूनच मला घाम फुटला.”

“स्विमसूटबद्दल ऐकल्यावर मी हे करू शकत नाही असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर दिग्दर्शकाबरोबर माझी एका मिटींग झाली. त्यांना मी सांगितलं की, माझं ब्रह्मचारी म्हणून नाटक आहे त्यात मी शॉर्ट्स घालते तसं मी घालेन पण, हे नाही जमणार. त्यावर त्यांनी टू पिस घालावा लागेल असं सांगितलं. ही साधारण १९८८ ते १९८९ च्या काळातील गोष्ट असेल. स्विमिंग सूटची अट ऐकल्यावर मी आणि माझी आई आम्ही दुसऱ्या क्षणाला फ्लाइट पकडून गोव्यात ( अभिनेत्रीच्या घरी ) परतलो. टू पिसचं नाव ऐकून मी बंगळुरूहून घरी पळून आले होते.” असं वर्षा उसगांवकरांनी सांगितलं.

हेही वाचा : Video : “मी बहिरा नाहीये…”, रणबीर कपूर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात करण जोहरवर भडकला, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षा पुढे म्हणाल्या, “शूटिंग सोडून अभिनेत्री घरी आल्यावर माझे वडील म्हणाले, तुला चित्रपटांत काम करायचं आहे ना? मग हे सोडून का आलीस…तू हे करायलं पाहिजे होतं. तुझी तयारी पाहिजे होती. ज्या वडिलांचा मला आयुष्यभर धाक वाटत होता. ते मला पाठिंबा देत होते. चित्रपट क्षेत्रात काम करण्यास त्यांची परवानगी नसेल असं मला वाटायचं पण, माझा समज चुकीचा होता. त्यांचे विचार त्याकाळात खूपच पुढारलेले होते. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुपरहिट झाला होता पण, मी त्यात काम करू शकले नाही. ती संधी गमावली नसती, तर आज मी कन्नड चित्रपटसृष्टीत सुद्धा लोकप्रिय असते.”