ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य यांनी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलभा आर्य यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सुलभा आर्य यांनी त्या काळी आंतरधर्मीय लग्न केलं होतं.

सुलभा आर्य यांचे पती इशान आर्य हे मुस्लीम होते. इर्शाद एहसान हे त्यांचं मूळ नाव. सुलभा यांच्याशी लग्न करण्यासाठी ते आर्य समाजी झाले होते. इतरंच नाही तर लग्नानंतर त्यांनी इशान आर्य हे नाव स्वीकारलं. इशान आर्य हे एक भारतीय सिनेमॅटोग्राफर आणि निर्माते होते. ते ‘गर्म हवा’ या चित्रपटाचे सह-निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर होते. सुलभा व इशान यांना समीर नावाचा मुलगा आहे.

त्या काळात आपला समाज इतका पुढारलेला नव्हता – सुलभा आर्य

सुलभा आर्य यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल सांगितलं.”त्याने (इशान) आणि त्याच्या कुटुंबाने जास्त हिंमत दाखवली असं म्हणायला हवं. कारण तो आर्य समाजी झाला आणि मग आम्ही लग्न केलं. माझ्या आई-वडिलांची किंवा इतर कुणाचीही अशी अट नव्हती, पण तरीही त्याने ते केलं. तो फिल्म इंडस्ट्रीतला होता, त्या काळात आपला समाज इतका पुढारलेला नव्हता की हिंदू-मुस्लीम लग्न सहज होईल. त्याचं असं होतं की एकदा आपल्याला लग्नाचा ठप्पा हवा. बाकी तू माझ्याबरोबर राहा, तुला जे करायचंय ते कर,” असं सुलभा आर्य म्हणाल्या.

मी कधीच सासूला बुरखा घातलेलं पाहिलं नाही – सुलभा आर्य

“नशीबाने मला सगळी चांगलीच माणसं मिळाली. मला प्रश्न होता माझ्या सासूचा. कारण काहीही म्हटलं तरी इतक्या वर्षांपूर्वी हे सगळं झालं. त्या नमाज पठण करायच्या. मी त्यांना कधी बुरखा घातलेलं पाहिलेलं नाही. आपल्याकडे दोन्ही धर्मांमध्ये कट्टर माणसं असतात. पण तसे लोक मला भेटले नाहीत. माहेरी पण नाही. माहेरच्या लोकांनी पण लवकर स्वीकारलं. माझ्या आई-वडिलांना लोक खूप मानायचे, तर त्यांना का दुखवायचं असा विचार इतरांनी केला. तो माझ्या घरी येऊन आई-वडिलांना भेटला होता. पण त्याचा काहीच तमाशा झाला नव्हता. आपला समाज इतका पुढारलेला नाही, तर नाही होणार असं ते बोलले होते, बाकी काहीच ड्रामा झाला नव्हता. सासरच्यांनी पण स्वीकारलं,” असं सुलभा आर्य यांनी नमूद केलं.

सासूबाईंनी निकाह करण्यास नकार दिला

“माझ्या सासू म्हणायच्या की मी नमाज वगैरे का करते, कारण तुम्ही कोणी माझ्याबरोबर नसता. मला गप्पा मारायला कुणीच नसतं. मला क्लबला जाता येत नाही, त्यामुळे हा वेळ घालवण्याचा उत्तम पर्याय आहे. काही लोक त्यांच्या पाठी लागलेले की ती आल्यावर आपण निकाह करू वगैरे. त्या बोलल्या असत्या तर मी केलंही असतं. मी विश्वास ठेवत नसले तरी. कारण माझ्यासाठी माणसं जास्त महत्त्वाची होती. जिथे तुमचा जन्म झाला, तो तुमचा धर्म झाला. तुम्ही स्वतः धर्म निवडून आलेले नाहीत. त्यामुळे मला या गोष्टीचा कुठेच त्रास झाला नाही. त्यांना जेव्हा कुणीतरी त्यांच्या कुटुंबातील लोकांनी निकाहाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, त्यांचं लग्न झालंय. हा काही बाहुल्यांचा खेळ नाहीये. असं करायचं आणि तसं करायचं वगैरे. झालंय त्यांचं लग्न,” अशी सासूबाईंची आठवण सुलभा आर्य यांनी सांगितली.

कोर्ट मॅरेज केलं नाही कारण…

सुलभा आर्य यांनी कुंकूचा एक किस्सा सांगितला. “एकदा मी कुठेतरी जाताना मुद्दाम कुंकू लावलं नव्हतं. की त्यांच्या बाजूच्या लग्नाला मी जातेय. तर सगळ्या बायका लगेच माझ्याकडे बघतील, मग त्यांना बोलतील. सासूबाईंना तेलुगू यायचं. त्या हैदराबादला राहायच्या. त्या मला म्हणाल्या, तूने वो गुट्टू नही लगाया? मी म्हणाले, अम्मा नाही लावलंय का मी? अरे विसरलेच. त्या म्हणाल्या, नाही बेटा. इथे बस. असं करायचं नाही. ही माझी सासू इतक्या वर्षांपूर्वी होती. ज्यांच्या मुलाने लग्न करायला आर्य समाजाचे विचार स्वीकारले. त्याने फक्त लग्नासाठी केलं, कारण त्याला त्याबद्दल फार माहीत नव्हतं. आमच्या सोईसाठी आम्ही आर्य समाज पद्धतीने लग्न केलं. कारण कोर्ट मॅरेज करण्याइतका वेळ नव्हता,” असं सुलभा आर्य यांनी नमूद केलं.