मराठी माणुस असे म्हटले की त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे नित्सिम प्रेम डोळ्यांसमोर येते. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही जनता करते. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते.

हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केले असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सिनेमातले एक पोवाडा गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेवर हा ‘ती तलवार’ हा पोवाडा चित्रित करण्यात आला आहे. या पोवाड्यात महाराजांचा गौरव करण्यात आला आहे. अनेक दिवसांनी श्रेयस मराठी सिनेमात दिसला आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी शीवभक्त दाखवण्यात आला आहे तर अनिकेत विश्वासराव एका राजकारणाची पार्श्वभूमी असलेली भूमिका साकारताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे शिर्षक गीत प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यात महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था दाखवण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे. सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार जातो हेच यातून दिसून येते. पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.