प्रेक्षकांचा कल आणि बदलणारी परिस्थिती या सर्व गोष्टी लक्षात घेत भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच ‘भाडिपा’ बहुविध प्रयोग करतच असतं. गणेशोत्सव म्हणून नका किंवा दिवाळी, प्रत्येक गोष्टीसाठी ‘भाडिपा’ने काही भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. २०१८ च्या सुरुवातीलासुद्धा त्यांनी अशीच एक कलात्मक गोष्ट आणि त्याच तोडीचे अफलातून कलाकार सर्वांसमोर आणले आहेत. तुमच्या, आमच्यातीलच हे कलाकार घेऊन आले आहेत मराठी रॅप साँग सायपर (१.० सामाजिक).
‘भाडिपा’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे रॅप साँग पोस्ट करण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य आणि या धकाधकीच्या आयुष्यातही मनात काहूर माजवणारे प्रश्न या रॅप साँगमधून कलाकारांनी सादर केले आहेत. ‘बुलेट ट्रेन नाही पर्याय कोणत्या विकासाचा….’ आणि ‘ठाकरे बंधू का नाही एकत्र’ असं म्हणत हे कलाकार त्यांच्या कलेचा हिप हॉप स्टाईलचा नजराणा सादर करण्यात यशस्वी होत आहेत. आतापर्यंत ‘भाडिपा’ने या मराठी रॅप साँगचे तीन व्हिडिओ पोस्ट केले असून, प्रत्येक व्हिडिओतून महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.
पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या रॅप साँगच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत सोबत सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही कटाक्ष टाकण्यात आला आहे. प्रगतीशील देशाची प्रगतीशील जनता, स्त्रीभ्रूण हत्या आणि भोंदूबाबांची फसवेगिरी इथपासून ते मुंबई मेट्रो आणि स्थानिक राजकारणामध्ये ठाकरे घराण्याची असणारी भूमिका या सर्व गोष्टींवर या मराठी रॅप साँगमधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या रॅप साँगमधील बऱ्याच ओळी लक्ष वेधत असून वस्तूस्थितीची जाणीव करुन देत आहेत.