Masaba Gupta on Vivian Richards: बॉलिवूडच्या अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक आणि फॅशन डिझायनर, अभिनेत्री मसाबा गुप्ताला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असल्याची धक्कादायक बाब तिने नुकतीच व्यक्त केली आहे. पत्रकार फेय डिसोझा यांच्याशी संवाद साधताना मसाबाने तिच्या आणि वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या आयुष्यातील काही कटू प्रसंगाचा दाखला दिला. मसाबा लवकरच बाळाला जन्म देणार असून ती आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पत्रकार फेयशी संवाद साधताना मसाबा म्हणाली की, आपलं बाळ उजळ रंगाचं व्हावं यासाठी तिला रसगुल्ला खाण्याचा आणि दूध पिण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच तिचे वडील आणि विंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनाही आयुष्यभर वर्णद्वेषाचा सामना करावा लागला, याची आठवणही मसाबाने सांगितली.

मसाबाने वैयक्तिक अनुभव कथन करताना म्हटले की, तिलाही अनेकदा रंगावरून हिणवण्यात आले. आता रंगावरून होणाऱ्या टिप्पण्या कमी झालेल्या आहेत. मात्र त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. पुढची काही दशकं रंगावरून होणारी टिप्पणी सुरूच राहिल, असंही मसाबा म्हणते.

हे वाचा >> “बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांसाठी महेश सरच परफेक्ट…”, आधीच्या पर्वातील स्पर्धकाचे स्पष्ट वक्तव्य, “रितेश सर खूपच…”

मसाबा गर्भवती राहिल्यानंतर तिला मसाज देण्यासाठी येणाऱ्या महिलेने बाळ गोऱ्या रंगाचे जन्मावे, यासाठी रोज रसगुल्ला खाण्याचा सल्ला दिला. मला मसाज करण्यासाठी येणाऱ्या महिलेने सांगितले की, तू रोज रसगुल्ला खा. जेणेकरून तुझं बाळ तुझ्यापेक्षा थोडं रंगाने उजळ होऊ शकेल. तसेच दुसऱ्या एका महिलेने सांगतिले की, तू रोज एक ग्लास दूध पित जा, जेणेकरून बाळाचा रंग उजळून निघेल. बाळ सावळे जन्मायला नको, असेही या महिलेने मला सांगितले. मसाबा सांगते की, या महिलांनी मला हे इतक्या अजाणतेपणाने सांगितले की, मी त्याच्यावर काही भाष्यही करू शकले नाही.

मसाबा म्हणते, “अशिक्षित किंवा निरक्षर असलेल्या महिला अशा टिप्पण्या सहज म्हणून किंवा काळजी म्हणून करत असतात. पण उच्चशिक्षित लोकांमध्येही रंगावरून बोलण्याचे प्रमाण अधिक आहे. एखाद्या महिलेला रंगावरून हिणवलं की तिला सहजपणे खाली खेचता येतं, हा समज अनेकांमध्ये आहे आणि मला हे हास्यास्पद वाटतं.”

हे पाहा >> Photos : अदिती राव हैदरी व सिद्धार्थने केलं दुसरं लग्न! दोघांच्या वयात आहे ‘इतक्या’ वर्षांचं अंतर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अभिनेत्री मसाबा गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स

वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांनीही खूप भोगलं

आपले वडील आणि माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स हे आजही वर्णद्वेषाच्या विरोधात लढत असल्याचेही मसाबाने सांगितले. “आज मला कळतंय की, माझे वडील इतक्या वर्षांपासून वर्णद्वेषाच्या विरोधात का संताप व्यक्त करत आहेत. आजही हा विषय काढला तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा ते तावातावाने वर्णद्वेषाबाबत बोलतात. त्यांनी लहानपणी खूप भोगलं आहे. ते ज्या काळात व्यावसायिक क्रिकेट खेळू लागले, त्याकाळी क्रिकेटमधील कौशल्यापेक्षा रंगाला अधिक महत्त्व होतं. जोपर्यंत आपण अन्यायाविरोधात लढत नाही, बोलत नाही, तोपर्यंत हा भेदभाव असाच सुरू राहिल. त्यामुळे वर्णद्वेषाबद्दल प्रत्येकाने लढलं पाहिजे”, असंही मसाबानं सागंतिलं.