‘सखाराम बाइंडर’ एक अशी गाजलेली कलाकृती जिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता १६ वर्षांनंतर हे नाटक अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित कलाकेंद्रची तीच जुनी टीम पुन्हा रंगमंचावर घेऊन येते आहे.

सतत दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देऊ पाहणारी आणि सामाजिक भान जपणारी मुक्ता बर्वे यावेळी या नाटकाचे पाच प्रयोग करणार आहे. ती हे पाच प्रयोग खास ‘रंगमंच कामगारांसाठी’ घेऊन येत आहे. सखारामच्या या पाच प्रयोगातून येणारा सगळा निधी हा ‘बॅकस्टेज’ च्या मित्रांना देण्यात येणार आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती मुक्ताला ‘चंपा’ च्या भूमिकेत पाहण्याची. स्वतः मुक्ताने या नाटकाविषयी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

मुक्ताने लिहिलं की, ‘१६ वर्षानंतर ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा ललितकला केंद्रच्या त्याच टीम बरोबर सादर करण्याचा आनंद आहेच पण त्याच बरोबर आम्ही एका चांगल्या कामासाठी हे प्रयोग करतोय याचं जास्त समाधान वाटतंय. मराठी रंगभूमी, नाट्यव्यवसाय त्याची १०० पेक्षा जास्त वर्षांची उज्वल परंपरा आहे. यामधे जितकं योगदान निर्माते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांच आहे तितकच मोलाचं योगदान आहे सगळ्या रंगमंच कामगारांच. मला नेहमी वाटतं की हे रंगमंच कामगार म्हणजे नाटकाचा भक्कम पाया असतात. पण त्यांच्या कष्टांच्या मानाने त्यांना मिळणारं मानधन , सोयीसुविधा नेहमीच कमी असतात. त्यामुळे दिनू काकांशी चर्चा करून आमच्या ललितकला केंद्रच्या माजी विद्यार्थ्यांच्या सगळ्या टीमने निर्णय घेतला की या ५ प्रयोगातून उभा राहील तो निधी आमच्या या बॅकस्टेजच्या मित्रांना द्यायचा. पण प्रयोग ५ असोत वा ५०० नाटक तर व्यवस्थित उभं व्हायला हवं. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत सगळंच. मग सगळ्या जवळच्या मित्रांकडे शब्द टाकले, प्रयोगाचा हेतू कळताच राहुल रानडे, प्रसाद वालावलकर , अजय कासुर्डे, संजय कृष्णाजी पाटील सर,अंजली अंबेकर मॅडम, कौस्तुभ दिवाण,सेवा मोरे, जयश्री जगताप, उमेश जगताप, विनायक कावळे आणि ही यादी वाढतेच आहे असे अनेक जवळचे स्नेही बरोबर उभे राहीले. या सगळ्यांच्या मदतीने अनामिका-रसिका सादर करत आहे ‘सखाराम बाइंडरचे ५ प्रयोग. आम्ही तुमची वाट बघत आहोत.