अनेकांची फेव्हरेट जोडी समांथा प्रभू आणि नागा चैतन्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. समांथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात दरी निर्माण झाली असून लवकरच दोघ विभक्त होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. समांथा आणि नागा चैतन्यबद्दल रोज वेगवेगळं वृत्त समोर आलं असलं तरी अद्याप दोघांनी देखील त्यांच्यातील दुराव्याबद्दल अधिकृतपणे वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्य़ने मात्र एका गोष्टीचं दु:ख व्यक्त केलं आहे.
फिल्म कॉम्पॅनियन साऊथसाठी बरद्वाज रंगन यांना नागा चैतन्यने दिलेल्या मुलाखतीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अलिकडच्या वृत्तामध्ये नागा चैतन्यच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होत आहेत. या वस्तूस्थितीचा तो कसा सामना करतो. हे खूप वेदनादायी आहे का? असा सवाल त्याला विचारण्यात आला होता. यावर नागा चैतन्य म्हणाला, “होय सुरुवातीला हे थोडं वेदनादायी होतं. मला असं वाटायचं की मनोरंजनाच्या बातम्यांचं हेडिंग अशा प्रकारे का दिलं जात आहे ?. पण त्यानंतर मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे आजच्या काळाच एक बातमीच बातम्यांची जागा घेते.” असं सूचक विधान त्याने केलंय.
पुढे नागा चैतन्यने या मुलाखतीत तो या संपूर्ण परिस्थितीकडे कसं पाहतो हे सांगत असतानाच या सर्वातून पुढे जाण्यासाठी त्याला कोणत्या गोष्टीची मदत झाली या गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “या गोष्टी लोकांच्या मनात फार काळ राहत नाहीत. ज्या खऱ्या आणि महत्वाच्या बातम्या असतात त्याच लक्षात राहतात. तर ज्या वरवरच्या आणि टीआरपी वाढवण्यासाठीच्या बातम्या असतात त्या लोक विसरून जातात. त्यामुळे जेव्हा या गोष्टी माझ्या लक्षात आल्या तेव्हापासून माझ्यावर अशा वृत्ताचा परिणाम होत नाही.” असं नागा चैतन्य म्हणाला.
तर घटस्फोटाबद्दलच्या चर्चांना उत्तर देताना नागा चैतन्यने त्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे वेगळं ठेवणं आवडत असल्याचं तो म्हणाला आहे. “कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीपासूनच मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आणि व्यावसायिक आयुष्यातील गोष्टी एकत्र होवू दिल्या नाहीत. मी माझ्या आई वडिलांकडून या गोष्टी शिकलो. जेव्हा ते घरी येत तेव्हा कामाबद्दल काहीच बोलत नसत. तर कामाच्या ठिकाणी ते घरगुती गोष्टी बाजूला ठेवत. त्यांनी अगदी सुंदर पद्धतीने हा समतोल राखला.” असं नागा चैतन्य म्हणाला.
दरम्यान, टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहेत.