Actress Died At 17 Weeks After Winning National Award : कलाकार म्हटलं की संघर्ष, आव्हानं ही आलीच. काहींना व्यावसायिक आयुष्यात, तर काहींना खासगी आयुष्यात याचा सामना जवळपास सगळ्यांनाच करावा लागतो. पण जर वारंवार वाट्याला दुख: येत असेल तर एका वेळेनंतर माणसाची जगण्याची इच्छा कमी होते. असंच काहीसं झालेलं लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर.
या लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या अभिनयकौशल्यानं अनेकांची पसंती मिळवलेली. एवढंच काय, तर त्यांना वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. या अभिनेत्री म्हणजे शोभा. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार अभिनेत्री प्रेमा व त्यांचे पती केपी मेनॉन यांच्या घरी जन्म घेतलेल्या शोभा यांनी चार वर्षांची असल्यापासूनच सिनेमात काम करायला सुरुवात केली. शोभा यांनी ‘सावित्री’ या तमीळ चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी मल्याळी इंडस्ट्रीतही पदार्पण केलं; परंतु शोभा यांच्या वडिलांचा या सगळ्याला विरोध होता.
शोभा यांनी त्यांच्या अभिनयानं अनेक फिल्ममेकर्सचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांना त्यांच्या कामासाठी केरळ राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला. तर, वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केलं, ज्यानंतर त्या कमल हासन यांच्याबरोबरही मल्याळी चित्रपटात झळकल्या. ‘उथ्राडा रात्रि’, ‘उल्कदल’, ‘एकाकिनी’, ‘बंधनम’, ‘मुल्लुम मल्लरूम’, ‘ओरु विदुकधै ओरु तोडरकधै’, ‘अळियाथा कोळंगल’ अशा तमीळ व मल्याळी चित्रपटांत काम करीत शोभा यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली.
१७व्या वर्षी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार
दिग्दर्शक दुराई यांच्या पसी (Pasi) या चित्रपटातील शोभा यांच्या अभिनयानं त्यांना संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली आणि अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व्यावसायिक आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना शोभा आणि दिग्दर्शक व छायाचित्रकार बालू महेंद्र ज्यांनी ‘कोकिळा’ (kokila) या कानडी चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. शोभा यांना बालू महेंद्र भेटले त्यावेळी त्यांचं लग्न आधीच झालेलं होतं. शोभा त्यांच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान होत्या. तर, दुसरीकडे शोभा यांच्या आई लेकीला काय हवं आहे याचा विचार न करता तिला फक्त कामाकडे लक्ष देण्यास सांगत होत्या. बालू व शोभा यांनी काही चित्रपटांत एकत्र कामही केलं.
शोभा यांनी ‘या’ कारणामुळे केलेली आत्महत्या
आधीच एक लग्न झालेलं असतानाही बालू यांनी शोभा यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. शोभा यांना वाटलेलं की, त्यांच्यासाठी बालू त्यांची पत्नी अखिलेश्वरी व मुलगा शंकी यांना सोडून त्यांच्याकडे येतील; पण असं काहीच झालं नाही आणि याचा शोभा यांना इतका त्रास झाला की, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या काही आठवड्यांनंतर शोभा यांनी १ मे १९८० रोजी आत्महत्या केली. शोभा यांच्या निधनानंतर त्यांच्या आई प्रेमा यांनी त्यांचा खून झाल्याचा दावा केला होता. लेखक सी. व्ही. अरविंद यांनी म्हटल्यानुसार शोभा यांच्या आत्महत्येच्या चार वर्षांनंतर प्रेमा यांनीही आत्महत्या केली.
२०२० मधील ‘द न्यूज मिनट’च्या अहवालानुसार बालू यांनी, शोभा त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या आणि त्यांच्या जाण्यानं त्यांना खूप त्रास झाल्याचं म्हटलं होतं. मल्याळी दिग्दर्शक के. जी. जॉर्ज यांचा लेखायुदे मेरानम उरु (Lekhayude Maranam Oru) हा चित्रपट शोभा यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. के. जी. जॉर्ज यांनी शोभा व महेंद्र यांच्याबरोबर काम केलं होतं आणि ते या दोघांना खूप जवळून ओळखत होते.