यावर्षी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चांगलाच गाजला. ३०० कोटी इतकी कमाई करणारा हा यावर्षातला पहिला हिंदी चित्रपट ठरला. चित्रपटात काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविषयी भाष्य करण्यात आलं. हा चित्रपट बऱ्याच कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. काहींना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट फार एकांगी वाटला. आता याच धर्तीवर आधारतीत कश्मीरची एक वेगळीच बाजू दाखवणारी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं नाव आहे ‘तणाव’. नुकताच या सीरिजचा टीझर सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रदर्शित केला गेला.

ही वेबसीरिज इस्राईली वेबसीरिज ‘फौदा’चं अधिकृत adaption असणार आहे. तब्बल दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये काश्मीरमधला तणाव, राजकीय संघर्ष आणि धार्मिक तेढ याचं चित्रण आपल्याला दिसतं. एकूणच या सीरिजमध्ये काश्मीरमधली आणखीन एक वेगळी बाजू बघायला मिळू शकते.

फौदा ही वेबसीरिज इस्राईलमधील आतंकवादी संघटना आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातल्या संघर्षावर बेतलेली आहे. तर ‘तणाव’मध्ये असाच संघर्ष आपल्याला बघायला मिळू शकतो. टीझरच्या शेवटी येणारं “ये कश्मीर है, कूछ खतम नहीं होने वाला” हे वाक्य ऐकून सीरिजमध्ये नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे या सीरिजची निर्मिती करणार असून, ते स्वतः या सीरिजचं दिग्दर्शनही करणार आहेत. या सीरिजमध्ये मानव वीज, अरबाज खान, रजत कपूर, झरीना वहाब हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच कित्येक नवीन चेहेरेदेखील या सीरिजमध्ये बघायला मिळू शकतात. एकूणच या सीरिजचा टीझर प्रदर्शित करताना सोनी लीव्हने “एकाच नाण्याच्या दोन बाजू” असं पोस्ट केलं आहे. त्यामुळे ही सीरिज म्हणजे ‘द कश्मीर फाईल्स’ला उत्तर अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगतान दिसत आहेत.