Nivedita Saraf Talks About Govinda : लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आजवर अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे. अशातच आता त्यांनी बॉलीवूड अभिनेता गोविंदाबरोबर काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला आहे.

गोविंदा हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्यानं अनेक चित्रपटांत काम करीत त्याच्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानं आजवर अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. परंतु, असं असताना अनेक कलाकार त्याच्याबद्दल सातत्यानं एक तक्रार करताना दिसतात. ती म्हणजेच गोविंदाबरोबर काम करतानाचा अनुभव सांगत बऱ्याचदा कलाकार तो खूप उशिरा सेटवर यायचा, असं म्हणताना दिसतात.

गोविंदानं स्वत: नुकतच अभिनेत्री काजोल व ट्विंकल खन्ना यांच्या कार्यक्रमात याबद्दल प्रतिक्रिया दिलेली. अशातच आता निवेदिता सराफ यांनीसुद्धा गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्याच्यामुळे खूप वाट पाहायला लागायची, असं म्हटलं आहे. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं. निवेदिता यांना मुलाखतीत तुमचा असा कोणी सहकलाकार होता का, जो सेटवर उशिरा यायचा आणि त्याच्यामुळे वाट पाहावी लागायची, असं विचारल्यानंतर त्यांनी गोविंदाचं नाव घेतलं.

निवेदिता सराफ यांची गोविंदाबद्दल प्रतिक्रिया

गोविंदाबद्दल निवेदिता म्हणाल्या, “हिंदीमध्ये मी काम केलं तेव्हा गोविंदा होता तसा. तासन् तास त्याच्यासाठी थांबावं लागायचं. मराठी कलाकार नेहमीच वेळेवर यायचे.” काही दिवसांपूर्वी गोविंदानं ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात स्वत: याबद्दल सांगितलेलं. गोविंदा याबद्दल म्हणाला, “मी सेटवर उशिरा जातो म्हणून मला बदनाम केलं गेलं; पण कोणामध्ये एवढी ताकद आहे का की, तो दिवसाला पाच शिफ्ट करून वेळेवर जाऊ शकेल.”

गोविंदा याबद्दल पुढे म्हणाला, “हे शक्यच नाहीये. एखादा माणूस इतकं शूटिंग कसं करू शकतो. इकडे तर एका चित्रपटात काम करता करता थकतात लोक.” त्याबद्दल गोविंदानं असंही सांगितलं की, काही वेळा गोष्टी त्याच्या हाताबाहेर होत्या, जसं की ट्रॅफिक, वेळापत्रक आणि इतर गोष्टी; ज्यामुळेही त्याला उशीर व्हायचा. पण, त्याबद्दल अनेकदा बातम्या यायच्या. लोक खूप चर्चा करायचे. त्यानं असंही म्हटलं की, उलट यासाठी एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा बॉलीवूडमधील लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे.