Ayushmann Khurrana’s Movies To Watch On OTT : आयुष्मान खुराना बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आयुष्मानने त्याच्या अभिनयशैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत, त्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. सध्या तो त्याच्या ‘थामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
आयुष्मान खुराना व रश्मिका मंदाना यांचा ‘थामा’ चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आयुष्मान व रश्मिका यामधून पहिल्यांदाच एकत्र झळकत आहेत, त्यामुळे यातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, आयुष्मानचा ‘थामा’ पाहण्याआधी तुम्ही त्याचे काही इतर भन्नाट चित्रपट पाहिलेत का? कोणते आहेत ते चित्रपट? वाचा यादी
अंधाधून : बॉलीवूडमधील देखण्या नटांपैकी एक असलेल्या आयुष्मानने काम केलेल्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी ‘अंधाधून’ हा एक आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहिला नसेल तर लवकर पाहा. यात ट्विस्ट, रहस्य, डार्क ह्युमर या गोष्टी पाहायला मिळतात. या चित्रपटात दमदार क्लायमॅक्स आहे जो पाहुन तुम्हाला धक्का बसेल. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.
बाला : या चित्रपटात आयुष्मानने एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली आहे, ज्याला डोक्यावर केस नसल्याने त्याच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. यामध्ये माणसाची खरी सुंदरता काय असते यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. याचसह या चित्रपटात कॉमेडीही भरपूर असल्याने तुम्हाला हा चित्रपट पाहताना मजा येईल. ‘नेटफ्लिक्स’वर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
शुभ मंगल ज्यादा सावधान : आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. आयुष्मानच्या हिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. हा चित्रपट ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.
एन अॅक्शन हिरो : आयुष्मान खुरानाने ‘एन अॅक्शन हिरो’सारख्या अॅक्शन चित्रपटातही काम केलं आहे. रोमँटिक भूमिका असो, कॉमेडी असो किंवा अॅक्शन करायचं असो आयुष्मानला प्रक्षकांचं मन जिंकण्यात अनेकदा यश मिळालेलं आहे. यामध्ये त्याने चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. त्याच्यासह अभिनेता जयदीप अहलावतही यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतो. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.
ड्रीम गर्ल २ : आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. हा चित्रपट तुम्हाला पोट धरून हसवतो. यामध्ये त्याने करमवीर ही भूमिका साकारलेली. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.