Banned Film Because of Bold Content : हल्ली चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि नंतर एक ते दोन महिन्यांत ते ओटीटीवर येतात. काही लहान चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. करोनाच्या साथीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सची संख्याही झपाट्याने वाढली. आपल्या देशात दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होतात. पण यापैकी काही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून प्रदर्शनास मंजुरी मिळत नाहीत. बोल्ड सीन किंवा आक्षेपार्ह भाषेमुळे बरेचदा चित्रपट वादात अडकतात.

सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यानंतरच आपल्या देशात चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करता येतात. पण त्याउलट ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिज किंवा चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागत नाही. त्यामुळे बोल्ड कंटेंटमुळे सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित न होऊ शकणारे सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी आता ओटीटी हा पर्याय निर्मात्यांसाठी खुला झाला आहे. काही बोल्ड कंटेंट व बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिलेल्या सिनेमांच्या सिनेमागृहातील प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती, हे चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहेत.

अनफ्रीडम

‘अनफ्रीडम’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बोल्ड कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली होती. नंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. या थ्रिलर चित्रपटात दोन बोल्ड थीम होत्या. एक लेस्बियन संबंध व दुसरी इस्लामिक दहशतवादाची थीम होती. राज अमित कुमार दिग्दर्शित या चित्रपटात व्हिक्टर बॅनर्जी, आदिल हुसेन आणि प्रीती गुप्ता हे कलाकार होते. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

अँग्री इंडियन गॉडेस

या चित्रपटावर त्यातील कंटेंटमुळे बंदी घालण्यात आली होती. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर चांगलाच वाद निर्माण झाला होता. लोकांनी या चित्रपटाला विरोधही केला. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डानेही यावर कात्री चालवली. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

फायर

हा इंडो-कॅनेडियन रोमँटिक ड्रामा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये शबाना आझमी आणि नंदिता दास मुख्य भूमिकेत होत्या. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट यूट्यूब व इतर काही ऑनलाइन वेबसाइटवर पाहता येईल.

द पिंक मिरर

या यादीत ‘द पिंक मिरर’ नावाच्या चित्रपटाचाही समावेश आहे. तृतीयपंथी पात्रांवर आधारित या चित्रपटाला ‘अश्लील आणि आक्षेपार्ह’ म्हणत सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. श्रीधर रंगायन यांचा ‘द पिंक मिरर’, ज्याला ‘गुलाबी आयना’ म्हटलं जातं, हा सिनेमा दोन तृतीयपंथी व एका समलिंगी किशोरवयीन तरुणाची कथा आहे.

लोएव

दोन गे मुलांच्या लव्ह लाइफवर हा चित्रपट आधारित आहे. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटात खूप बोल्ड सीन आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

गार्बेज

कौशिक मुखर्जीने दिग्दर्शन केलेल्या ‘गार्बेज’ चित्रपटाची कथा रामी नावाच्या मुलीवर आधारित आहे. चित्रपटात रामीचा बोल्ड एमएमएस लीक होतो, अशी कहाणी आहे. या चित्रपटात भरपूर बोल्ड सीन्स आहेत. या कारणामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं नाही. चित्रपटात त्रिमला अधिकारी, शतरुपा दास आणि तन्मय धनिया यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.