‘पंचायत ३’ नंतर आता जितेंद्र कुमारची आगामी वेब सीरिज ‘कोटा फॅक्टरी ३’ ची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजच्या तिसऱ्या भागाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर ‘कोटा फॅक्टरी’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये जीतू भैय्या एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.
‘कोटा फॅक्टरी’चे याआधीचे दोन्ही सीझन तुफान गाजले होते. २०१९ मध्ये ‘कोटा फॅक्टरी’चा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता तिसऱ्या सीझनसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वत: जीतूने या तारखेबाबत घोषणा केली आहे. पण, यातच सर्वात मोठा ट्विस्ट आहे. स्पष्टपणे तारीख न सांगता जितेंद्र कुमारने चाहत्यांना गणिताचं एक कोडं सोडवायला दिलं आहे. हे कोडं तुम्हाला सोडवायला जमतंय का? तिच रिलीज डेट आहे असं या व्हिडीओमध्ये अभिनेता सांगतो.
जितेंद्र कुमारचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करत चाहत्यांनी विविध अंदाज बांधायला सुरुवात केली होती…काही लोकांचा अंदाज चुकला, तर काही लोक हे कोडं सोडवण्यात आणि तारीख ओळखण्यात यशस्वी ठरले. प्रेक्षकांना जास्त बुचकळ्यात टाकायला नको म्हणून नेटफ्लिक्सने अखेर या सीझनची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली आहे. ‘कोटा फॅक्टरी’चा तिसरा सीझन येत्या २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जीतू भैय्या पुन्हा एकदा मुलांना शिक्षणाचे धडे देणार आहे.
‘कोटा फॅक्टरी ३’ या सीरिजची स्टारकास्ट
‘कोटा फॅक्टरी’च्या नव्या भागात जितेंद्र कुमार जीतू भैय्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मयूर मोरेने वैभव पांडे, आलम खानने उदय गुप्ताची भूमिका केली आहे. याशिवाय रंजन राजने बालमुकुंद मीना, अहसास चन्नाने शिवांगी राणौत, उर्वी सिंहने मीनल पारेख, रेवती पिल्लईने वर्तिका रतवाल, नवीन कस्तुरियाने ध्रुव, विपुल सिंगने महेश, अरुण कुमारने दीपक हे पात्र साकारलं आहे. ज्योती तिवारी वैभवच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत, अमिताभ कृष्णा घाणेकर वैभवच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आणि राजेश कुमार गगनच्या भूमिकेत झळकणार आहेत.