Squid Game S3 Ending: दक्षिण कोरियाची वेबसीरीज ‘स्क्विड गेम’ पहिल्या भागापासून ओटीटी विश्वात धुमाकूळ घालत आहे. २७ जून रोजी या मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सीझन प्रदर्शित झाला. प्रदर्शन झाल्यानंतर या मालिकेने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. लाखो चाहत्यांनी बिंज वॉच केल्यामुळे नेटफ्लिक्सचे अ‍ॅप काही वेळासाठी क्रॅश झाल्याची बातमीही समोर आली होती. मात्र या सीझनचा शेवट अनेक चाहत्यांना आवडलेला नाही. त्यावरून आता टीका सुरू झाली आहे. दक्षिण कोरियातही याचे पडसाद उमटले असून थेट शेअर बाजारात स्क्विड गेमशी निगडित कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर या सीरीजचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते ह्वांग डोंग-ह्युक यांनी नेटफ्लिक्स आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखत देऊन शेवट असा का केला? याची माहिती दिली.

स्पॉयलर अलर्ट: या बातमीत स्क्विड गेमच्या शेवटाबद्दल थोडक्यात माहिती आहे.

स्क्विड गेम वेबसीरीजमधील सर्वच पात्र हे या सीरीजचे सर्वात मोठे शक्तीस्थळ आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम, संकट समोर असताना त्यांच्यातील समोर आलेले खरे रुप, माणुसकी, लोभ, लालसा आणि हिंस्रपणा या भावना मालिकेत पदोपदी ठासून भरलेल्या आहेत. त्याबरोबर मालिकेत खेळले जाणारे खेळ त्यात अजून रंगत भरतात. पहिल्या सीझनपासून मध्यवर्ती भूमिका असलेले प्लेअर नंबर. ४५६ अर्थात गि-हून हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

अभिनेते ली जंग-जे यांनी स्क्विड गेममध्ये गि-हून हे पात्र साकारले आहे. त्यांच्या पात्राशी जगभरातील चाहते जोडले गेले असताना शेवटच्या सीझनमधील अखेरच्या भागात त्यांचा शेवट दाखविण्यात आल्यामुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. पहिल्या सीझनप्रमाणे हॅप्पी एंडिंगचा कयास बांधलेल्या चाहत्यांना हा मोठा धक्काच होता. यातून दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर टीका होऊ लागली. अखेर नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शकांनी यावर उत्तर दिले.

लेखक, दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक, अभिनेते ली जंग-जे आणि फ्रंट मॅनचे पात्र रंगविणाऱ्या ह्वांग इन-हो यांनी नेटफ्लिक्सवर तिसऱ्या सीझनबाबत संवाद साधला. यावेळी दिग्दर्शक म्हणाले की, दुसरा आणि तीसरा सीझन लिहिताना मी वेगळा शेवट लिहिला होता. त्यात गि-हून गेममधून जिवंत बाहेर पडून अमेरिकेत त्याच्या मुलीला भेटायला जातो, असे दाखवायचे होते. हा शेवट अनेकांना आवडला असता. पण जेव्हा मी खोलात जाऊन विचार केला, तेव्हा यातून मी जगाला कोणता संदेश देऊ इच्छितो? हा प्रश्न मला सतावू लागला.

squid games s3 ending review
स्क्विड गेमच्या तिसऱ्या सीझनमध्ये प्लेअर नं. ४५६ आणि फ्रंट मॅन ह्वांग इन-हो यांच्यात जुगलबंदी दाखविण्यात आली आहे.

“वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी बलिदान कधी कधी गरजेचे असते. जागतिक पातळीवर आज याच प्रकारची स्थिती दिसते. आर्थिक असमानता वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आ वासून उभी आहे. अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. एकूणच जगात असुरक्षित स्थितीत जगणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अशावेळी जगासमोर एक उदाहरण स्थापित करणे गरजेचे आहे. प्लेअर नं. ४५६ तिसऱ्या सीझनमधून जिवंत बाहेर पडू शकला असता. पण त्याने जगासमोर एक उदाहरण प्रस्थापित केले आहे”, असे लेखक-दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक म्हणाले.

ह्युक पुढे म्हणाले की, तिसऱ्या सीझनमध्ये बाळाला आणण्याचा विचारही यातून प्रसवला. सीझनच्या शेवटी बाळच उरते. यातून आम्हाला भावी पिढीला आपण कशापद्धतीचे जग देत आहोत, हे दाखवायचे होते. बाळाला चांगले जग मिळण्यासाठी गि-हून जो निर्णय घेतो, तो वास्तवाला धरून आहे. किंबहुना आजच्या परिस्थितीत चांगला समाज निर्माण करण्यासाठी असा त्याग आवश्यकच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
squid-game-s3 ending exlained
स्क्विड गेमच्या तिसऱ्या भागात एक अनपेक्षित वळण येते, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. (Photo – Netflix)

तिसरा सीझन संपताना प्लेअर नंबर ४५६ अर्थात गि-हून स्क्विड गेमचे कर्तेधर्ते आणि फ्रंट मॅन यांच्याकडे त्वेषाने पाहून “आपण शर्यतीचे घोडे नाही तर माणसं आहोत”, असा डायलॉग म्हणतो. हा डायलॉगही आता जगभरातील सोशल मीडियात चर्चेत आहे. दक्षिण कोरियन कलाकृतीने जगभरातील चाहत्यांना उत्तम वेबसीरीजच नाही तर त्यातून बोध घ्यावा, असा संदेशही दिला आहे.