‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल यांनी अचानक एक्झिट घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. परेश रावल यांच्या एक्झिटमुळे आता ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि बाबू भैयाचं त्रिकुट पाहायला मिळणार नाही. परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही धक्का बसला आहे.
परेश रावल यांनी अचानक बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर अनेक चाहत्यांची निराशाच झाली आहे. यानंतर अक्षय कुमारच्या निर्मित संस्थेकडून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला होता. परेश रावल यांनी करारावर स्वाक्षरी करूनही ‘हेरा फेरी ३’ चित्रपटातून बाहेर पडले आणि यामुळे निर्मात्यांचं आर्थिक नुकसान झालं, असा दावा अक्षय कुमारच्या निर्मिती संस्थेकडून करण्यात आला होता. त्यावर परेश रावल यांनीही कायदेशीर उत्तर पाठवलं.
पण, तुम्हाला माहीत आहे का परेश रावल यांनी अक्षयचा चित्रपट सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी परेश रावल यांनी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ चित्रपटातूनही माघार घेतली होती. हा अभिनेता २०१२ मध्ये आलेल्या ‘ओएमजी’, ‘ओह माय गॉड’ चित्रपटात होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. २०२३ मध्ये जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल ‘ओएमजी २’ प्रदर्शित झाला तेव्हा परेश रावल त्यात नव्हते. त्यांच्या जागी पंकज त्रिपाठीची निवड करण्यात आली.
बॉलीवूड बबलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, अभिनेत्याने सिक्वेलमध्ये भूमिका न करण्याचे कारण सांगितले होते. ते म्हणाले होते, “मला स्क्रिप्ट आवडली नाही म्हणून मी त्याचा भाग होऊ इच्छित नव्हतो.” अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले, “मला सिक्वेलमधील पात्र आवडले नाही म्हणून मी ते स्वीकारण्यास नकार दिला. जर तुम्ही सिक्वेल बनवत असाल तर ते मुन्नाभाई एमबीबीएससारखे ठेवा.” मुलाखतीत परेश रावल यांच्याबरोबर आलेली अभिनेत्री रत्ना पाठक शाह त्यांच्याशी सहमत झाल्या आणि म्हणाल्या, “सिक्वेल या अवघड गोष्टी आहेत.”
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड २’मध्ये पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘ओएमजी २’ला रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राबाबत अनेक अडचणी आल्या, तरीही तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक बनला.