paresh rawal on aamir khan and salman khan :बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी बॉलीवूडमधील जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केले आहे. त्यांनी अलीकडेच आमिर खान आणि सलमान खानबरोबर सेटवर काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल त्यांचे दृष्टिकोन शेअर केले. दोन्ही सुपरस्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव कसा असतो हे त्यांनी सांगितले.
‘बॉलीवूड बबल’शी बोलताना परेश रावल यांनी सलमान खानचे कौतुक केले. ते म्हणाले, “सलमान कोणताही सीन मनापासून समजून घेतो. तो खूप आकर्षक व्यक्ती आहे. तो पडद्यावर जादू करतो. जेव्हा तो सेटवर येतो तेव्हा त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही. सलमान ‘हवा का झोंका’ आहे; तो फक्त त्यात रमून जातो.
‘आमिरसाहेबांना थोडा वेळ लागतो’ : परेश रावल
त्यानंतर त्यांनी सांगितले की, आमिर खानची दृष्टी अधिक तीव्र आहे. त्याला पात्रात उतरण्यासाठी वेळ हवा असतो. ते म्हणाले, आमिरला काम करावं लागतं आणि गोष्टी सखोल व बारकाईनं जाणून घ्याव्या लागतात. म्हणूनच आमिरसाहेबांना थोडा वेळ लागतो. म्हणूनच आमिर शूटिंग करताना जास्त वेळ घेतो.
परेश रावल यांनी सलमानबरोबर सोहेल खानचा १९९७ चा अॅक्शन थ्रिलर ‘औजार’, डेव्हिड धवनचा २००० चा रोमँटिक कॉमेडी ‘दुल्हन हम ले जायेंगे’, राज कंवरचा २००० चा रोमँटिक कॉमेडी ‘हर दिल जो प्यार करेगा’, अनीस बज्मीचा २०११ चा अॅक्शन कॉमेडी ‘रेडी’ आणि अली अब्बास जफरचा २०१७ चा स्पाय थ्रिलर ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, परेश रावल आणि आमिर खान यांनी एसए कादर यांच्या १९९२ च्या अॅक्शन रोमान्स ‘दौलत की जंग’, आशुतोष गोवारीकर यांच्या १९९५ च्या अॅक्शन थ्रिलर ‘बाजी’ व मन्सूर खान यांच्या १९९५ च्या रोमँटिक ड्रामा ‘अकेले हम अकेले तुम’मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. रावल यांनी यापूर्वी आमिर आणि सलमानच्या कामाच्या शैलीची तुलना केली आहे, तेव्हा त्यांनी असा दावा केला होता की, त्यांना सलमान व शाहरुख खानपेक्षा आमिर चांगला अभिनेता वाटतो.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, परेश रावल ‘निकिता रॉय’मध्ये दिसणार आहेत. त्यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.