मुंबईच्या दादर येथे राहणारी मराठमोळी पौर्णिमा बुद्धिवंत हिने ‘मिस इंडिया एक्स्विसिट २०१९’ या सौंदर्यस्पर्धेत बाजी मारली असून ‘मिस एक्स्विसिट इंटरनॅशनल २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. अमेरिकेत पार पडणाऱ्या या स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. आर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावरही पौर्णिमाने मनातली आवड जोपासली. सौंदर्यस्पर्धेत उतरून नाव कमवायचं स्वप्न तिने पूर्ण केलं.

आर्किटेक्चरचे शिक्षण झाल्यावर पौर्णिमाने सहज म्हणून एक मॉडेलिंगचा प्रोजेक्ट केला. लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद आला. तेव्हा तिला सौंदर्य म्हणजे केवळ रंग वा उंची नसून तरुणीमधील आत्मविश्वास आहे हेही तिला कळलं. पौर्णिमाने सौंदर्य स्पर्धांमध्ये आतापर्यंत बरीच पारितोषिके मिळवली आहेत. पोर्णिमा एक ‘कर्व संकलन’ नावाने एक आर्ट ग्रूप सुदधा चालवते ज्यात लहान मुलांसाठी फ्री पेंटिंगचे वर्कशॉप घेतले जातात.

https://www.instagram.com/p/Bxgr9ZypIjK/

आपली महत्त्वाकांक्षा सांगताना पौर्णिमा म्हणते, आर्किटेक्चर आणि मॉडेलिंग या दोन्ही गोष्टींसाठी मी तितकीच मेहनत घेतली आहे. कॉलेजमध्ये असताना माझं आर्किटेक्चरचं कामही नेहमी नावाजलं जायचं, यामुळे पुढे भविष्यात मला आर्किटेक्चरच्या क्षेत्रातच काम करायचे आहे. म्हणजे पर्यावरणाला धरून असलेले काम करायला मला आवडेल. याचसोबत एखाद्या मराठी चित्रपटात सामाजिक विषयाला धरून काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी चांगल्या संधीची वाट बघतेय.