तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये हिंदी भाषेत बोलल्यामुळे एका व्यक्तीच्या प्रकाश राज यांनी कानशिलात लगावल्याचे दाखवण्यात आले आहे. या सीनवर जोरदार टीका होत आहे. आता प्रकाश राज यांनी त्यावर त्यांचे मत मांडले आहे.

प्रकाश राज यांनी नुकतीच ‘न्यूज ९’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘जय भीम’ चित्रपटातील चर्चेत असणाऱ्या सीनवर मत मांडले. ‘जय भीम चित्रपट पाहिल्यावर त्यांना त्या लोकांच्या वेदना दिसल्या नाहीत, त्यांच्यावर झालेला अन्याय दिसला नाही. त्यांना फक्त एक कानशिलात लगावली हे दिसलं. त्यामुळे त्यांचा अजेंडा स्पष्ट झाला आहे’ असे प्रकाश राज म्हणाले.
आणखी वाचा : ‘जय भीम’ चित्रपटातील त्या सीनवर जोरदार टीका, हटवण्याची केली जातेय मागणी

आक्षेप घेतलेल्या दृष्याविषयी बोलताना ते म्हणाले की एखाद्या प्रकरणाचा तपास करणारी व्यक्ती स्थानिक भाषा माहिती असूनही हिंदीमध्ये बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असू शकते हे दाखवण्यात आले आहे.

काय आहे सीन?
‘जय भीम’ चित्रपटातील एका सीनमध्ये एक व्यक्ती हिंदी भाषेत प्रकाश राज यांच्याशी बोलत असतो. त्यावेळी प्रकाश राज त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर ती व्यक्ती मला का मारले असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर प्रकाश राज यांनी ‘तमिळमध्ये बोल’ असे म्हटले आहे. याच सीनवर सध्या आक्षेप घेतला जात आहे. टी जे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जय भीम’ चित्रपटात अभिनेते प्रकाश राज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.