Pushpa 2 Box Office Collection Day 8 : ‘पुष्पा 2: द रूल’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
‘पुष्पा 2: द रुल’ ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे हे त्याच्या कमाईच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. वीकेंडला बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या या चित्रपटाने वीक डेजमध्येही दमदार कमाई केली. रिलीज झाल्यापासून आठ दिवसात ‘पुष्पा 2: द रुल’ने कमाईचे नवीन विक्रम केले आहेत.
‘पुष्पा 2’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘पुष्पा 2’ने पेड रिलीजच्या आधीच्या दिवशी प्रिव्ह्यूमधून १० कोटी ६५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर रिलीजच्या दिवशी १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन ९३.८ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ११९,२५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने चौथ्या दिवशी १४१ कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे पाचव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ६४.४५ कोटी रुपये होते. चित्रपटाने सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी रुपये आणि सातव्या दिवशी ४३.५५ भारतात कोटी रुपये कमवले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.
हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
‘पुष्पा 2’ची सर्वाधिक कमाई हिंदीतून
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने आठव्या दिवशी ३७.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये ७२५.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तेलुगूमध्ये २४१.९ कोटी रुपये, हिंदीमध्ये ४२५.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ५.३५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १२.४ कोटी रुपये कमावले आहेत.
‘बाहुबली 2’ ला मागे टाकत ‘पुष्पा 2’ हा जगभरात सर्वात जलद १००० कोटी रुपये कमावणारा भारतीय चित्रपट ठरला. अवघ्या सात दिवसांत ‘पुष्पा 2’ १००० कोटी कमावले, तर ‘बाहुबली 2’ ने १० ते ११ दिवसांत १००० कोटी कमावले होते.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटाची निर्मिती मैथ्री मूव्ही मेकर्सने केली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘पुष्पा 2’ हा अल्लू अर्जुनच्या २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे.