R Madhavan : अभिनेता आर. माधवन हा आता FTII चे नवे अध्यक्ष असणार आहेत. आर. माधवन यांची नॅशनल फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) च्या अध्यक्षपदी माधवनची निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि आ’र. माधवन यांचं अभिनंदनही केलं आहे. आर. माधवनच्या ‘रॉकेट्री द नांबी इफेक्ट’ या सिनेमाला नुकतंच सर्वश्रेष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

आर. माधवन यांच्या अनेक भूमिका चर्चेत

आर. माधवन हे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक नावाजलेला अभिनेते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. १९९७ मध्ये आलेल्या इन्फर्नो या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. हिंदी, तमिळ या सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करुन माधवनने त्याचा असा खास चाहता वर्ग तयार केला आणि तो टिकवलाही. राजू हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मध्येही तो झळकला होता. तर ‘रहना है तेरे दिल मे’ सिनेमातला त्याचा रोल प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.

हे पण वाचा- ‘द व्हॅक्सिन वॉर’ पाहून आर माधवनने दिली प्रतिक्रिया, विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाबद्दल म्हणाला…

तमिळ भाषेप्रमाणेच हिंदीवरही माधवनचं प्रभुत्व

एका मुलाखतीत माधवन यांनी हे सांगितलं होतं की मी हिंदी आणि तमिळ दोन्ही भाषा चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. त्यामुळेच मी या दोन्ही भाषांच्या सिनेमांमध्ये काम करु शकलो. माधवन यांनी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे. त्याच्या आई वडिलांना वाटत होतं की माधवन यांनी इंजिनिअर व्हावं. मात्र माधवन यांनी पब्लिक रिलेशन्स हा विषय घेऊन एम. ए. केलं. कोल्हापुरात ते स्पिकिंग कोर्सेसही घ्यायचे. त्यांचा हा फॉर्म्युला तेव्हा खूप हिट झाला होता. मुंबईत आल्यानंतर आर माधवन यांनी मॉडेलिंग केलं. त्यानंतर सीरियल्समध्येही काम केलं. त्यानंतर ते सिनेमांमध्ये काम करु लागले. थ्री इडियट्सच्या फरहानची आणि माझी गोष्ट काही प्रमाणात मिळती जुळती आहे असंही माधवनने सांगितलं होतं. हेच आर माधवन आता FTII चे अध्यक्ष झाले आहेत. ज्यानंतर आता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

हे पण वाचा- Video: आर माधवनच्या मुलाचा थाटच न्यारा! थेट चालवली पोर्शे, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘गुरु’, ‘तनु वेड्स मनु’, ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ या आणि अशा एकाहून एक सरस सिनेमांमध्ये माधवनने विविधरंगी भूमिका साकारल्या. गुरु सिनेमातला त्याचा शाम सक्सेना हा पत्रकार अद्यापही लोकांच्या लक्षात आहे. रहना है तेरे दिलमें सिनेमातलं त्याचं ‘मॅडी’ हे नाव त्याला चिकटलं ते कायमचंच. एवढंच नाही तर ९० च्या दशकात आलेल्या ‘साया’, ‘सी हॉक्स’, ‘बदलते रिश्ते’, ‘ये कहाँ आ गये हम’ या हिंदी मालिकांमध्येही माधवन झळकला आहे.