Rajinikanth’s Flop Movie:चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आज यशाच्या शिखरावर आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अपयशाचा सामना केलेला आहे. रजनीकांत अशाच कलाकारांपैकी एक आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी सुपरस्टारपैकी एक म्हणून रजनीकांत यांची ओळख आहे. त्यांच्या बहुतेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले आहे. मात्र, त्यांच्याही आयुष्यात असा एक काळ आला होता, ज्यावेळी रजनीकांत यांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला.

२०१४ मध्ये रजनीकांत यांनी लिंगा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक के.‌ एस. रविकुमार होते. के. एस. रविकुमार आणि रजनीकांत यांनी लिंगा चित्रपटाआधी १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुथु’ व १९९९ सालच्या ‘पडयप्पा’ या दोन्ही चित्रपटांत एकत्र काम केले होते. विशेष म्हणजे रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. त्यामुळे या रजनीकांत व के. एस .रविकुमार एकत्र येणार म्हणून लोकांच्या लिंगा या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या.

या चित्रपटात सुपरस्टारने सिव्हिल इंजिनीयर आणि त्याचा नातू अशी दुहेरी भूमिका साकारली होती. सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटात के. विश्वनाथ, जगपती बाबू, संथानम, करुणाकरण व ब्रह्मानंदम यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘लिंगा’ या चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिले होते.

२१ डिसेंबरला रजनीकांत यांच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. १०० कोटी रुपयांच्या बजेटच्या या चित्रपटाने जगभरातील एकूण व्यवसायाच्या बाबतीत चांगली कामगिरी केली. मात्र, त्याचा फायदा सर्वांनाच होऊ शकला नाही.

२०१५ च्या ‘फर्स्टपोस्ट’च्या अहवालानुसार, निर्माते वेंकटेश यांनी लिंगा इरॉस इंटरनॅशनलला विकली. इरॉस इंटरनॅशनलने तमिळनाडूचे वितरण हक्क वेंधार मूव्हीजला विकले. वेंधार मूव्हीजने चित्रपटाची विक्री क्षेत्रफळानुसार केली. साखळीच्या शेवटी वितरकांपर्यंत पोहोचेपर्यंत चित्रपटाची किंमत वाढली होती. अहवालात म्हटले आहे की, खर्च केलेली रक्कम पाहता, लिंगा ब्लॉकबस्टर झाला असता तरीही त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली नसती.

लिंगा चित्रपटाच्या वितरकांचे ५४ कोटींचे नुकसान

तुतीकोरिन, कन्याकुमारी व तिरुनेलवेली येथे चित्रपटाचे वितरण करणाऱ्या एका भागधारकाने डेलियोशी साधलेल्या संवादात म्हणलेले की त्यांनी दिलेल्या रकमेपैकी फक्त ३० टक्के रक्कम त्यांना परत मिळाली. आयएएनएसशी बोलताना, वितरक सिंगारावदिवेलन यांनी खुलासा केलेला की, इरॉस इंटरनॅशनलने लिंगा चित्रपटाचे थिएटर हक्क १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत घेतले. तमिळनाडूतील वितरकांना ३३.५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला; तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि परदेशी बाजारपेठेतील वितरकांना २० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाल्याने एकूण ५४ कोटींचे नुकसान झाले होते. रजनीकांत यांचे जवळचे विश्वासू व अधिकृत मध्यस्थ तिरुपूर एम. सुब्रह्मण्यम यांनीही याला दुजोरा दिला होता.

हा वाद वाढला आणि निर्मात्यांनी त्यांच्या नुकसानाची भरपाई करावी, अशी मागणी वितरकांनी केली. कन्याकुमारी जिल्ह्यातील वितरक एम. रुबेन यांनी एनडीटीव्हीला सांगितलेले की, त्यांनी २९ थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे हक्क मिळवण्यासाठी चार कोटी रुपये दिले होते; परंतु त्यांची गुंतवणूक फक्त अर्धीच वसूल करण्यात त्यांना यश आले. “सामान्यत: रजनीकांत यांच्या चित्रपटांसाठी २० टक्के नफा सहज मिळतो; पण यावेळी त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे”, असे ते म्हणाले होते.

भीक मागण्याचे आंदोलन…

आयएएनएसच्या वृत्तानुसार भरपाईची मागणी दिली पाहिजे यासाठी काही वितरकांनी चेन्नईच्या पोएस गार्डनमधील रजनीकांतच्या घराबाहेर सामूहिक भीक मागण्याचे आंदोलन करण्याची धमकीही दिली.

वितरक म्हणालेले की आमचे पैसे त्यांनी परत करावेत, आम्ही त्यांच्याकडे ते मागावेत, अशी वेळ त्यांनी आमच्यावर आणली आहे. आमच्याकडील पर्याय संपले असल्याने आम्ही ते करू. आम्ही रजनीकांतच्या घराबाहेरच भीक मागू,” असे सिंगारावदिवेलन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. रजनीकांत यांनी वितरकांना भेटण्यास नकार दिल्याचा आरोप करीत त्यांचे लक्ष वेधण्यासाठी वितरकांनी वल्लुवर कोट्टमसमोर एक दिवसाचे प्रतीकात्मक उपोषण केल्याची माहिती समोर आली होती.

रजनीकांत यांनी लिंगा चित्रपटाआधी ‘बाबा’ व ‘कुसेलन’ या चित्रपटांना अपयश आल्यानंतर वितरकांना नुकसानभरपाई दिली होती. त्यांनी पुन्हा एकदा लिंगाच्या वितरकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. द क्विंटच्या वृत्तानुसार, रजनीकांत आणि रॉकलाइन वेंकटेश यांनी वितरकांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले. तमिळनाडू चित्रपट निर्माते परिषदेने जाहीर केले की, वितरकांना एकूण १० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

या सगळ्यामुळे रजनीकांत यांना धक्का बसला होता आणि ते अस्वस्थ झाले होते.