बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असते. गेल्या वर्षी ‘बिग बॉस १४’ मध्ये ती दिसून आली होती. या शोमधून ती बरीच चर्चेत आली होती. ‘बिग बॉस १४’ मध्ये आल्यानंतर तिने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. तसंच पती रितेश बद्दल अनेक गोष्टींचा खुलासा देखील करताना ती दिसून आली.
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचा पती कसा दिसतो आणि तो कोण आहे याबद्दल कुणालाच माहिती नाही. पण अनेकदा ती पती रितेश बद्दल बोलताना दिसून आली. आता तीने बिग बॉस १५ मध्ये येण्यासाठीची इच्छा व्यक्त केलीय. परंतु यावेळेला तिला एकटीला यायचं नाही, तर पतीसोबत तिला बिग बॉस १५ मध्ये एन्ट्री करायची आहे. राखी सावंतने नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केलीय.
या मुलाखतीत बोलताना राखी सावंत म्हणाली, “बिग बॉस १५ मध्ये मला माझ्या पतीसोबत जायचं आहे. त्याने माझ्यासोबत लग्न केलंय, याची जाणीव करून देण्यासाठी मला तिथे त्याच्यासोबत जायचंय. शो मध्ये जाऊन बिग बॉस आणि सलमान खान या दोघांनीही माझ्या पतीला चांगली समज दिली पाहिजे. लग्न करून कोणी एखाद्याला सोडून देत नाही, हे त्याला कळलं पाहिजे.”
बिग बॉसच्या घरात पतीसोबत रहायचंय
यापुढे बोलताना राखी सावंत म्हणाली, “आतापर्यंत मला पतीसोबत राहण्याची संधी कधीच मिळाली नाही. जर मी माझ्या पतीसोबत बिग बॉसच्या घरात गेले तर संपुर्ण देश मला पाहिल. आम्ही दोघे एकत्र कसे राहतो आणि आमची ट्यूनिंग काय आहे हे सगळ्यांना कळेल. आमचं रिलेशनशीप १०० टक्के कायम रहावं, अशी माझी इच्छा आहे. मी एकच पती, एकच जीवन, एकच देव आणि एकच जग यावर विश्वास ठेवते.”
पतीपासून वेगळी झाल्याच्या बातमीवर दिली प्रतिक्रिया
राखी सावंतला तिचा पती रितेशने सोडून दिलं, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू होत्या. याबद्दल विचारल्यानंतर राखी सावंत म्हणाली, “माझ्या पतीने मला सोडलं ही नाही आणि एकत्र सुद्धा नाही. मधल्या मध्ये टांगणीवर आहे. पण मला माझ्या पतीचा गर्व वाटतोय. ते खूप चांगले व्यक्ती आहेत आणि हूशार सुद्धा आहेत. ते सुशिक्षीत असून एक उद्योजक आहेत. पण त्यांना राग लवकर येतो. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ते सुधारतील, असं मला वाटतं. सगळ्यांचा सर्व टेंपरामेंट बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर गायब होतो.”
राखी सावंतने तिची इच्छा व्यक्त तर केली आहे. पण ती आपल्या पतीला घेऊन बिग बॉसच्या घरात कधी जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत राखीने पतीसोबतचे कोणते फोटोज समोर आणले नाही. त्यामुळे राखी सावंत तिचं लग्न आणि पतीबाबत जे बोलत असते ते साफ खोटं असल्याचं लोकांना वाटू लागलंय. पण राखीने कित्येकदा तीचं लग्न झाल्याचं सांगितलं आहे.