आयटम गर्ल राखी सावंत सध्या भगवान वाल्मिकी आणि त्यांच्या काही भक्तांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आहे. वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी लुधियाना न्यायालयाने राखी विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, राखीने वाल्मिकी समुदायाविरोधात वक्तव्य केल्याचे आरोप फेटाळले आहेत. सलमान खानचा दाखला देत राखीने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी राखी म्हणाली की, “मी सलमान खान नाही. मी राखी सावंत आहे. माझ्यावर आरोप करुन काहीही मिळणार नाही. मी साधी मुलगी असून, समाज कार्यासोबतच मी चित्रपटामध्ये काम करते.” मागील वर्षी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ असा केल्यामुळे राखी अडचणीत सापडली आहे. याप्रकरणी अॅड. नरिंदर आदिया यांनी राखीविरोधात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवून देखील राखीने न्यायालयात हजरी लावली नाही. आक्षेपार्ह वक्तव्याच्या आरोपाप्रकरणात ९ मार्चला झालेल्या सुनावणीवेळी राखी अनुपस्थित होती. तिने न्यायव्यवस्थेचा एक प्रकारे अपमानच केला. त्यानंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

राखी सावंत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्याच्या घडीला स्वत:च्या डोक्यावर अटकेची टांगती तलावर असतानाही तिने सलमानचा दाखला देत आणखी एक वाद ओढवून घेतला. सलमानविरोधातील बोलण्यामुळे तिला त्याच्या चाहत्यांच्या टीकेला देखील सामोरे जावू लागू शकते.