मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर काल त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. आर्यनची सुटका झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्वीट करत आर्यन खानला पाठिंबा दिला. मात्र प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेले मजेशीर ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. यंदाच्या दिवाळीला एक खानच रिलीज झालाय, असे ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी आर्यन खानच्या सुटकेनंतर एक मजेशीर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाल्याची तुलना दिवाळीतील चित्रपटांसोबत केली आहे. “बॉलिवूडमध्ये दिवाळी ही कायम खान लोकांच्या चित्रपट रिलीजसाठी राखीव असायची, आता एक खानच दिवाळीनिमित्त रिलीज झालाय”,असे ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या या ट्वीटवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडत आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.