सेचेल्लेस येथे मे महिन्यात होणाऱ्या ‘मिस बिकनी ऑनलाईन २०१४’ स्पर्धेसाठी प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री सिमॉन रॉय भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला ३ प्रवेशिका पाठविण्याची परवानगी असून, पहिल्या फेरीसाठी ५०० पेक्षा जास्त स्पर्धक असणार आहेत.
मुळची कोलकाता येथील असलेल्या सिमॉन रॉयने अनेक फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प-वॉक केले आहे. एनलायटन आणि फेमिना सारख्या अनेक मासिकांच्या कव्हरवर झळकलेली सिमॉन काही तामिळ आणि तेलगू चित्रपटातदेखील काम करत आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सिमॉन रॉय म्हणाली, ‘मिस बिकनी ऑनलाईन २०१४’ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समितीने माझी निवड केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझी काही छायाचित्रे मी या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय समितीकडे पाठवली होती. त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने कालांतराने मी ही गोष्ट विसरून गेले. अचानक २४ फेब्रुवारी रोजी मला एक ईमेल आला, ज्यात या मानाच्या स्पर्धेत माझी निवड निश्चित झाल्याचे म्हटले होते. प्रथम मला थोडीशी शंका वाटली. परंतु, या स्पर्धेबाबतचे आणखी एक सविस्तर ईमेल मला आयोजकांकडून पाठविण्यात आले, ज्यात सेचेल्लेस येथे मे महिन्यात ही स्पर्धा होणार असल्याचे म्हटले आहे. या मानाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असून, चांगली कामगिरी करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीन.
दर वर्षी होणाऱ्या ‘मिस बिकनी ऑनलाईन’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन ‘७ स्टार इंक’ यांच्या सहयोगाने करण्यात येते. इंटरनेटवरून मिळणारी मते आणि लाईक्सद्वारे विजेतींची घोषणा करण्यात येते. विजेतींना भेटवस्तूंसह एकूण १,००,००० अमेरिकन डॉलर्सची पारितोषिके वाटण्यात येतात. काही आंतरराष्ट्रीय मॉडेलनी या स्पर्धेवर टीका केली आहे. स्पर्धेसाठी वापरण्यात येणारी ऑनलाईन मतदानाच्या पद्धतीत त्रुटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही व्यावसायिक सोशल मार्केटींग समुहाकडून ही ऑनलाईन मतदानाची प्रणाली हॅक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. असे असले तरी, खोटे मतदान आणि लाईक्स होऊ नये, यासाठी अनेक तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात येत असल्याचे स्पर्धेच्या संयोजकांचे म्हणणे आहे.