Rani Mukeji On Daughter Name Necklace : ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी तिचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जीने नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात तिने घातलेल्या नेकलेसमागील कारण सांगितले. राणीने या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना एक नेकलेस घातला होता. यामध्ये तिच्या मुलीचे नाव दिसत आहे. आदिरा या नावाची अक्षरे या नेकलेसवर दिसत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर या नेकलेसची चर्चा रंगताना दिसत आहे.
इंडिया टुडेशी बोलताना राणीने सांगितले की, त्या दिवशी तिच्या मुलीला जवळ ठेवण्याचा हा नेकलेस तिच्यासाठी एक मार्ग होता. ती म्हणाली की आदिरा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास उत्सुक होती, परंतु १४ वर्षांखालील मुलांना परवानगी नाही हे तिला सांगण्यात आले तेव्हा तिचे मन दुखावले गेले. राणी म्हणाली, “ती ओरडत होती कारण तिला राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा भाग व्हायचे होते, माझ्या खास दिवशी ती माझ्याबरोबर असू शकत नाही हे ‘अनफेयर’ आहे.”
राणी मुखर्जी पुढे म्हणाली, माझ्या मुलीला माझ्याबरोबर ठेवण्याचा हा नेकलेस घालणे हा सर्वात जवळचा मार्ग होता. ती म्हणाली, “ती माझी लकी चार्म आहे, मला ती माझ्याबरोबर हवी होती आणि हे मी करू शकणारा सर्वात जवळचा मार्ग होता…”
राणीने लोकांचे आभार मानले
राणी म्हणाली, “मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी ‘राणी तिच्या मुलीला बरोबर घेऊन गेली’ असे लिहिलेले इन्स्टाग्राम रील्स बनवले. हे रील्स मी आदिराला दाखवले आणि त्यामुळे ती शांत झाली.
राणी मुखर्जीने १९९७ मध्ये ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मेहंदी’, ‘कहीं प्यार ना हो जाए’, ‘प्यार दिवाना होता है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘बादल’, ‘मर्दानी’, अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभनेत्री म्हणून राणी मुखर्जीची ओळख निर्माण झाली. २०१४ मध्ये राणीने आदित्य चोप्राबरोबर लग्नगाठ बांधली. २०१५ मध्ये त्यांना मुलगी झाली, तिचे नाव आदिरा असे आहे.