Raveena Tandon sea-facing home : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन केवळ तिच्या अभिनय आणि ग्लॅमरसाठीच ओळखली जात नाही, तर लोक तिच्या आलिशान जीवनशैलीबद्दलही खूप चर्चा करतात.
१९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे, जे अजूनही तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ती मुंबईतील सी-फेसिंग बंगल्यात राहते आणि तिचे पती अनिल थडानी, दोन्ही मुले राशा-रणबीर आणि सासू-सासऱ्यांबरोबर राहते. अभिनेत्रीने तिचे घर वेगवेगळ्या डिझाइनद्वारे सजवले आहे, जे मोरोक्कन, फ्रेंच, युरोपियन व दक्षिण भारतीय वास्तुकलेपासून प्रेरणा घेते.
रवीनाच्या घराची किंमत ७० कोटी रुपये
रवीना टंडनच्या घराचे नाव ‘नीलाया’ आहे, ज्याचा अर्थ ‘निळे निवासस्थान’ असा होतो. ईटी नाऊच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या वांद्रेमधील या घराची किंमत सुमारे ७० कोटी रुपये आहे. त्याच वेळी रिअल इस्टेट रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, तिच्या घराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदरपणे डिझाइन केले गेले आहे, जे आतील कलात्मक सौंदर्याची झलक देते.
रवीनाच्या घरात नंदी, गणपती, शिव व पार्वती यांच्या दगडी मूर्ती आहेत. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार या मूर्ती ठेवल्या आहेत. त्याच वृत्तानुसार, प्रवेशद्वारावर असलेली नंदीची मूर्ती ५० वर्षांहून अधिक जुनी असल्याचे सांगितले जाते. ती दक्षिण भारतातील एका मंदिरांच्या शहरातून आणण्यात आली होती.
सजावटीत कला महत्त्वाची भूमिका बजावते. परेश मैती व थोट्टा वैकुंठम यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची चित्रे त्यांच्या भिंतींना रंग आणि व्यक्तिमत्त्व देतात. लिव्हिंग रूममध्ये संगमरवरी फरशी आणि लाल विटांच्या भिंती आहेत, ज्या आधुनिक शैलीला पारंपरिक आकर्षणाशी जोडतात.
त्याशिवाय सीटिंग एरियामध्ये मोठ्या काचेच्या दरवाजांजवळ आरामदायी राखाडी आणि काळे सोफे ठेवलेले आहेत. जवळच एक बार काउंटर आहे. त्याशिवाय डायनिंग एरियामध्ये युरोपियन फील आहे.
रवीना टंडनची एकूण संपत्ती
GQ च्या अहवालानुसार, रवीना टंडनची एकूण संपत्ती १६६ कोटी रुपये आहे. ही अभिनेत्री विलासी जीवन जगते. २००४ मध्ये तिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानीशी लग्न केले.