scorecardresearch

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, ‘झुंड’नंतर आणखी एका नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकतंच झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला. अत्यंत फ्रेश आणि रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटाच्या लक्षवेधी चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

“आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. चित्रपटाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून पहिले सात रंग कोणते ते स्पष्ट केलं आहे, आठवा रंग कोणता? याचं उत्तर चित्रपटाद्वारे मिळणार आहे. यात रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदची चित्रपटसृष्टीतली दमदार एंट्री पाहायला मिळत आहे.

अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. खुशबू सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

समीर कर्णिक यांनी क्युं हो गया ना.. या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rinku rajguru and vishal aanand starrer athva rang premacha new movie teaser release nrp

ताज्या बातम्या