अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा : चॅप्टर १’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मुंबईत या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यात बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी उपस्थित होता. चित्रपट पाहिल्यानंतर सुनील शेट्टीने त्याचे खूप कौतुक केले. ऋषभ शेट्टीने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनातील काही फोटो शेअर केले. त्यादरम्यान, ऋषभने सुनीलने चित्रपटाला दिलेल्या पाठिंबा आणि कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘कांतारा : चॅप्टर १’ हा ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वेल आहे. हा चित्रपट ऋषभ शेट्टीने लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकतेच मुंबईत त्याचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. सुनील शेट्टीही यावेळी उपस्थित होता.

इन्स्टाग्रामवर स्क्रीनिंगचे फोटो शेअर करताना अभिनेता ऋषभ शेट्टीने लिहिले, “सुनील शेट्टी अण्णांच्या उपस्थितीने एक खास संध्याकाळ आणखी खास झाली. ‘कांतारा : चॅप्टर १’साठी तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे.” फोटोंमध्ये ऋषभ शेट्टीची पत्नी प्रगती शेट्टी आणि सहकलाकार गुलशन देवैयादेखील बॉलीवूड अभिनेत्याबरोबर उभे असल्याचे दिसत आहेत.

सुनील शेट्टी काय म्हणाला?

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने चित्रपटाला एक अदभुत सिनेमॅटिक अनुभव बनवल्याबद्दल ऋषभ आणि त्याच्या टीमचे कौतुक केले. त्याने त्याच्या एक्स टाइमलाइनवर लिहिले, “काल रात्री ‘कांतारा चॅप्टर १’ माझ्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेला आणि माझ्या आत्म्याला हलवून गेला. चित्रपट इतका उत्कृष्ट होता की, त्याने माझ्या अंगावर काटा आणला, अश्रू आणले, अभिमानाची भावना दिली आणि मनाची शांती दिली.”

त्याने पुढे लिहिले, “मला वाटते की, हेच खऱ्या सिनेमाचे सार आहे. ते तुम्हाला तुमच्या मुळांशी जोडते. भारतीय सिनेमा खऱ्या अर्थाने हेच दर्शवतो. जेव्हा तो आपली भूमी, आपले लोक, आपले देव प्रतिबिंबित करतो तेव्हा तो पवित्र बनतो आणि जोपर्यंत आपण या कथांशी विश्वासू राहतो तोपर्यंत सिनेमा कधीही कमी दर्जाचा असू शकत नाही.” त्यांनी त्यांच्या पोस्टचा शेवट चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करून केला आणि म्हटले की, ऋषभ शेट्टीसारखी व्यक्तीच असे चित्रपट बनवू शकतो.