scorecardresearch

‘RRR’ ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट! जगभरातील चित्रपटांना मागे टाकत पटकावला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी शेअर करण्यात आली आहे.

‘RRR’ ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट! जगभरातील चित्रपटांना मागे टाकत पटकावला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड
आरआरआरच्या शिरपेचात मानाचा तुरा, जिंकला आणखी एक अवॉर्ड

राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. “आरआरआर चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन. बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे,” असं ट्वीटमध्ये म्हटलंय. या ट्वीटबरोबर रामचरणचा फोटो असलेलं एक पोस्टरही ट्वीट करण्यात आलं आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एसएस राजामौली यांचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये ते ट्रॉफी हातात धरून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट यंदा बॉक्स ऑफिससह अवॉर्ड शोदेखील गाजवत आहे. ‘ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट’, ‘अर्जेंटिना 1985’, ‘बार्डो’, ‘फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ऑफ ट्रुथ्स’, ‘क्लोज’ आणि ‘डिसीजन टू लीव्ह’ या चित्रपटांना धोबीपछाड देत ‘RRR’ ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला आहे.


‘नाटू नाटू’ने पटकावला गोल्डन ग्लोब

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 09:21 IST

संबंधित बातम्या