कोल्हापूरला चित्रपटसृष्टीचे माहेर मानले जाते. भारतात चित्रपटसृष्टीचा पाया चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये घातला; पण, मराठी चित्रपटसृष्टीचा पाया कलानगरी कोल्हापूर शहरात बाबुराव पेंटर यांनी घातला. याचा अभिमान मराठी भाषकांना आणि कलाकारांना नक्कीच आहे. कोल्हापूर चित्रनगरीला बाबूराव पेंटर यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. अशात कोल्हापूर शहराचे नाव बदलून ‘कलापूर’ असं करा, अशी मागणी अभिनेते सचिन पिळगावकरांनी केलीय. त्यामूळे कोल्हापूर शहराच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

नुकत्याच झालेल्या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर यांनी ही मोठी मागणी केलीय. चित्रपट महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी २००९ मध्ये चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करताना चित्रनगरीला पेंटरांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र पुढे काहीच झाले नाही. चित्रनगरी आता कात टाकत असताना अभिनेते सचिन पिळगावकरांनी ही मोठी मागणी केलीय. यावेळी बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले, “कोल्हापूर असं त्या शहराचं नाव कधीच नव्हतं. चित्रपट निर्मितीचा गाव म्हणून त्या शहराचं ऐतिहासिकत्व आहे. अनेक कलावंतांनी तिथे चित्रपटक्षेत्रातील महत्त्वाचे पहिलेवहिले प्रयोग केले आहेत, सर्व प्रकारचे कलाकार तिथे घडले आहेत. त्यामूळे त्या शहराला लोक ‘कलापूर’ असं म्हणत होते. ज्याप्रमाणे इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे ‘कलापूर’ शहराचा उच्चर वेगळा करत त्यांनी ‘कोल्हापूर’ असं केलं.” त्यामूळे कोल्हापूर शहराचं नाव जे पूर्वीचं होतं तेच ‘कलापूर’ असं करावं, अशी मागणी सचिन पिळगावकरांनी केलीय. यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार असल्याचं देखील या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बदलत्या सिनेमाक्षेत्रावर देखील आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सिनेमाक्षेत्र आता खूप बदललं, याला आता डिजीटल स्वरूप प्राप्त झालंय. त्यामूळे सध्याच्या काळात सिनेमांमध्ये पूर्वीसारखी मजा राहिलेली नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की सिनेमाक्षेत्रातील नविन प्रयोगांना स्विकारत नाही. गेली ५८ वर्षे मी या क्षेत्रात काम करतोय. या कारकिर्दीत मी अनेक नविन प्रयोग केलेत. मी अजूनही शिकतोय.”