जगातला प्रत्येक जण थोडा तरी अतरंगी असतोच. एखादा अतिशहाणा दिसला की नकळत म्हटले जाते काय वाय झेड आहे. याच वाय झेड म्हणजे धम्माल, मस्ती, दंगा आणि मुख्य म्हणजे अॅटीट्यूड असलेल्यांसाठी समीर संजय विध्वंस ‘YZ’ हा चित्रपट घेऊन आला आहे.  डबल सीट या चित्रपटानंतर दिग्दर्शक समीर विध्वंस आणि क्षितीज पटवर्धन ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. गेले काही दिवस अतिशय अनोख्या पद्धतीने सोशल मिडियावर या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येत होती. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. यामध्ये सई ताम्हणकर, सागर देशमुख, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सई या चित्रपटात सामान्य मुलीच्या वेशात दिसते. तर पर्ण आणि अक्षय एकदम वेस्टर्न लूकमध्ये यात पाहावयास मिळतात.
समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या जोडीनं आतापर्यंत नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला एकापेक्षा एक सरस व दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘डबलसीट’ आणि ‘टाइमप्लीज’ हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरलेले आहेत. रोजच्या जगण्याशी संबंधित तरीही टवटवीत कथा, क्षणात आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तीरेखा आणि विनोदाचा प्रसन्न शिडकावा हे त्यांच्या आतापर्यंतच्या कलाकृतींचं ठळक वैशिष्ट्य राहिलेलं आहे.