Saif Ali Khan Recalls Father Mansoor Ali Pataudi’s Advice : सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांनी ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या ‘टू मच’ या शोमध्ये विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी त्यांच्या पत्नीला राग आल्यावर काय करायचं यावरदेखील चर्चा केली. सैफने सांगितले की, त्याचे वडील टायगर पतौडी यांनी वैवाहिक जीवनात वाढणारी भांडणे टाळण्याचा सल्ला दिला होता. अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबरोबरच्या त्यांच्या भांडणांबद्दलही चर्चा केली.

सैफने खुलासा केला की, त्याने एकदा त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांना विचारले की, लग्नानंतर भांडण झाल्यावर ते काय करायचे. त्याच्या वडिलांनी यावर खूप उपयुक्त सल्ला दिला होता. सैफ म्हणाला, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं, “जेव्हा जेव्हा वाद होतो तेव्हा मी फक्त क्रिकेट खेळण्याचा किंवा इतर काही करण्याचा विचार करू लागतो. मी काहीही बोलत नाही, तुम्ही असं दाखवा की तुम्ही त्यांचं ऐकत आहात.”

अक्षय कुमारने दिला हा सल्ला

यावर अक्षयने त्याची पत्नी ट्विंकलबद्दल म्हटले, “ती आग आहे तर मी पाणी आहे, ती मनात येईल ते बोलते. मी फक्त शांत राहतो. फक्त ऐका आणि ती काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते करा, पण ऐका. मला वाटते की प्रत्येक पती हा चांगला श्रोता असावा.”

सैफ अली खानने १९९३ साली ‘परंपरा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सैफ अली खान अनेकदा त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. अभिनेत्याने १६ ऑक्टोबर २०१२ ला अभिनेत्री करीना कपूरबरोबर लग्नगाठ बांधली, त्याला तैमूर व जेह ही दोन मुले आहेत.

सैफ अली खान अलीकडेच नेटफ्लिक्सवरील ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात दिसला होता. यापूर्वी त्याने ज्युनियर एनटीआरच्या ‘देवारा: पार्ट १’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. १७ वर्षांनंतर तो आता अक्षय कुमारबरोबर प्रियदर्शनच्या ‘हैवान’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.