Salman Khan Got His First Role By Walking Into A Garage : ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खान एका रात्रीत स्टार बनला, पण त्या चित्रपटाच्या खूप आधी त्याचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ (१९८८) होता. या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन दिले नाही. खरंतर, चित्रपटाचे दिग्दर्शक जे. के. बिहारी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी सलमानला त्यांच्या ऑफिसमध्ये येताना पाहिले तेव्हाच त्याला ‘बीवी हो तो ऐसी’ साठी कास्ट केले.

आज सलमान खान बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. एक काळ असा होता जेव्हा त्यालाही इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अलीकडेच चित्रपट दिग्दर्शक जे. के. बिहारी यांनी खुलासा केला की, जर सलमान खानने तो सलीम खान यांचा मुलगा असल्याचे उघड केले असते तर त्याला त्याचा पहिला चित्रपट मिळाला नसता.

सलमान खानला त्याचा पहिला चित्रपट कसा मिळाला?

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक जे. के. बिहारी यांनी खुलासा केला की, “मी माझ्या गॅरेजमध्ये बसलो होतो आणि एका मुलाला रस्ता ओलांडताना पाहिले, तो एक फाईल घेऊन येत होता. त्याची चाल पाहून मी त्याला साइन करण्याचा निर्णय घेतला.” रेखा आणि फारुख शेख अभिनीत ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटात सलमानने फारुख शेखच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. ही एक छोटी पण अर्थपूर्ण भूमिका होती. या चित्रपटातून सलमानचे बॉलीवूड पदार्पण झाले.

जे. के. बिहारी पुढे म्हणाले की, सलमानने भूमिका मिळवण्यासाठी कधीही त्याच्या वडिलांचे नाव घेतले नाही. ते म्हणाले, “तो माझ्याकडे आला आणि माझ्याशी बोलला आणि मी हो म्हटले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. सलमानने त्याच्या वडिलांचे नाव सांगितले नाही. जर त्याने वडिलांचे नाव घेतले असते तर मी कदाचित त्याला कास्ट केले नसते.” त्यावेळी सलीम खान हे बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित लेखकांपैकी एक होते आणि त्यांच्या मुलाने इतक्या लहान भूमिका साकारल्याने सलमानची नम्रता आणि शिकण्याची उत्सुकता दिसून आली.

नंतर जेव्हा बिहारीला कळले की सलमान खान हा सलीम खान यांचा मुलगा आहे, तेव्हा त्यांना काळजी होती की तो तरुण अभिनेता मागे हटेल. पण, तसे कधीच घडले नाही. बिहारी म्हणाले, “सलीम खान म्हणाले, ‘तू एक नवीन दिग्दर्शक आहेस, तो देखील नवीन आहे.”

चित्रपट निर्मात्याने असेही उघड केले की, सलमानने निर्मात्याबरोबर तीन चित्रपटांचा करार कमी रकमेत केला, कारण त्याला काम सुरू करायचे होते. ते म्हणाले, “सलमानला ब्रेक हवा होता, म्हणून तो काहीही करायला तयार होता; म्हणून माझ्या निर्मात्याने त्याच्याबरोबर खूप कमी रकमेत तीन चित्रपटांचा करार केला.” अगदी एका वर्षानंतर, सलमानला ‘मैने प्यार किया’ मध्ये मुख्य भूमिकेत लाँच करण्यात आले.

सलमान खान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच त्याने आर्यन खानच्या ‘द बॅडस ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये एक छोटीशी भूमिका साकारली आहे.