शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमधून पुनरागमन करणारा अभिनेता रजत बेदीने ‘पार्टनर’च्या शूटिंगमधील एक मनोरंजक किस्सा सांगितला. या चित्रपटात त्याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानबरोबर पहिल्यांदाच काम केले.
रजत बेदी ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या यशाचा आणि त्याच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करीत आहे. त्याने आयएएनएसशी संवाद साधला. ‘पार्टनर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण करून देताना रजत बेदी म्हणाला की, सलमान खान पहिल्याच दिवशी त्याचा चेहरा पाहून हसायला लागला होता. रजत बेदी म्हणाला, “माझे सलमान खानशी कौटुंबिक नाते आहे. सलीम साहेब (सलमानचे वडील) माझ्या वडिलांना आणि आजोबांना खूप चांगले ओळखत होते. सलमानभाई माझ्या कुटुंबामुळे मला खूप प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. पण, सलमान खान ‘पार्टनर’च्या सेटवर आला तेव्हा पहिल्या दिवशी मी टेबलासमोर बसलो होतो आणि त्यावेळी फंकी हेअरस्टाईल आणि स्पाइकी लूक फॅशनमध्ये होते. म्हणून मी डेव्हिड धवनच्या चित्रपटासाठी फंकी लूक घेण्याचा विचार केला.”
रजत बेदी काय म्हणाला?
रजत पुढे म्हणाला, “मला आठवते जेव्हा सलमान भाई माझ्यासमोर येऊन बसले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते हसले. मला वाटले, ‘हा माणूस का हसत आहे?’ आणि तो हसणे थांबवू शकला नाही. तो जेव्हा जेव्हा मला पाहायचा तेव्हा तेव्हा तो म्हणायचा की, माझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. मग आम्ही सलमान भाईबरोबर तो सीन केला.”
रजत म्हणाला, “आणि नंतर जेव्हा मी स्वतःला पडद्यावर पाहिले, तेव्हा मला वाटले की, मी खूप मूर्ख दिसत आहे. हे खूप मूर्खपणासारखे होते. मग मला जाणवले की, माझा भाऊ माझ्यावर हसत आहे. मी मूर्ख नंबर १ सारखा दिसत होतो. तो खूप जोरात हसत होता आणि मला लाज वाटत होती.” यापूर्वी रजत बेदीने खुलासा केला होता की, आर्यन खान आणि त्याचे मित्र ‘कोई मिल गया’ चित्रपटाचे खूप मोठे चाहते आहेत.