ओसंडून वाहणारं सभागृह. पायऱ्यांवर खास लेखकी झोळ्या, लॅपटॉप सांभाळणारे उत्सुक खांदे. मी मनात म्हटलं, लेखकांना श्रेय मिळत नाही, अभिनेत्यांना सोडून बाकी कोणालाच किंमत नाही; असा कितीही वैताग केला तरी आपली ‘जमात’सुद्धा ‘स्टार्स’च्या प्रभावाला भुलतेच!  नाही तर आम्ही खास सूर्यवंशी पाखरं, वांद्रे येथील सेंट अँड्रूजसमोर सकाळी दहाच्या उद्घाटनाला साडेआठपासून कशाला रांग लावतोय? .. सुपरस्टार आमिर खान येणार म्हणूनच ना..?

स्क्रीन रायटर्स असोसिएशनने (एसब्ल्यूए) आपल्या नावाजलेल्या  ‘इंडियन स्क्रीनरायटर्स कॉन्फरन्स’च्या पाचव्या आवृत्तीची घोषणा केली, तेव्हाच आमिर खान प्रमुख पाहुणा, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ हे प्रमुख वक्ते म्हणून येणार असल्याचं घोषित केलं होतं. तेव्हापासूनच या कॉन्फरन्सचं वलय विस्तारू लागलं. तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरातमधून प्रतिनिधींची नोंदणी सुरू झाली होती. आणि गेल्या आवृत्तीप्रमाणे या आवृत्तीलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळणार, याविषयी आम्हा कार्यकारिणींच्या मेंदूत शंका उरली नव्हती. आणि तरीही पहिल्या दिवशी भारतभरातून आलेल्या लेखकांची जी अप्रतिम ऊर्जा आम्ही अनुभवली, ती मन भरून टाकणारी होती. दुसऱ्या दिवशी आमिर खान नसतानाही (उत्तमोत्तम विषयांवर इंडस्ट्रीतली दिग्गज येऊ न चर्चा करणार असताना!) ‘टिकणार आहे का बरं हा उत्साह?’, असा खवचट विचारसुद्धा येऊन गेला.

पण दुसऱ्या दिवशीसुद्धा झोळ्या; लॅपटॉप बॅग्ज तशाच! ‘निर्माते, लेखक: शत्रू की मित्र’ अशा गमतीदार पण बोचऱ्या; अंजुम राजबली यांनी सूत्रसंचालन केलेल्या; सिद्धार्थ रॉय कपूर (निर्माते- तारे जमीं पर, जोधा अकबर, लन्चबॉक्स), आमिर खान, अमित मसूरकर (न्यूटन), यांच्या चर्चेला किंवा माध्यमांसाठी लिहिताना पुराणकथा, इतिहास यांचा कसा वापर केला जाऊ  शकतो, या तांत्रिक विषयावरच्या शमा झाईदी (ज्येष्ठ सिनेलेखक, मंथन, भूमिका) डॉ. बोधिसत्त्व (पुराणकथा, महाकाव्य अभ्यासक) यांच्या चर्चानासुद्धा तितकाच भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मला २०१६ च्या इंडियन स्क्रीन रायटर्स कॉन्फरन्सची आठवण आली. पी. साईनाथ सारखा लाखमोलाचा मॅगसेसे विजेता प्रमुख पाहुणा, अशोक बाजपेयीसारखा कवी आणि भूमिका घेणारा विचारवंत! सुपरस्टार कोणीही नव्हता. आणि तरीही हेच ८०० आसनांचे सभागृह असेच भुकेल्या डोळ्यांनी भरले होते. दोन्ही दिवस!..

यशस्वी लोक नेमका काय विचार करतात याची उत्सुकता असणाऱ्या, एकमेकांना भेटून नेटवर्क वाढवू बघणाऱ्या माध्यमातल्या लेखकांची भूक, २०१८ मध्येही कायम होती. वेळेवर पैसे नाही, निर्मात्यांसोबत करार नाही, कामाचं श्रेय नाही, चित्रपट-मालिका-वेबसीरीजच्या प्रकल्पावरून कधीही उचलबांगडी होण्याची टांगती तलवार.. अशा अनेक समस्यांची भुतावळ लेखकांच्या बोटांवर तांडव करत असते. या मुद्दय़ांवर माहिती देणारं, कायद्यात लेखकांसाठी काय तरतुदी आहेत, याविषयी परिपूर्ण माहिती देणारं सत्र ‘एसडब्ल्यूए’च्या ‘डीसप्यूट सेटलमेंट’ समितीवर मोलाचे काम करणाऱ्या विनोद रंगनाथ यांनी मांडले. (‘मस्त’, ‘इष्क-विष्क’ सिनेमांचे लेखक). सोबत होते कॉपीराइट वकील सुश्रुत देसाई. या सत्राचा प्रश्नोत्तराचा भाग तर संपता संपत नव्हता. कारण एक तर लेखकाला लिखाणाची झिंग उतरल्यावरच ‘अरे पैसे मिळाले नाहीत, करार झाला नाही,’ वगैरे व्यवहार आठवतात, तोवर ‘चिडिया चुग गयी खेत’ झालेलं असतं! या सत्रामुळे अनेक गोंधळांना स्पष्टता मिळाली, किती तरी लेखकजीव शांत झाले.

दरवर्षी आम्ही कॉन्फरन्सची एक संकल्पना ठरवतो. दोन वर्षांपूर्वीची संकल्पना होती ‘सो फार.. सो नीअर’.  जागतिक चित्रपटांचा प्रभाव आणि आपलं वास्तव यांचा समन्व्यय; दर्जेदार चित्रपट लिहिण्यासाठी कसा साधायचा, हा केंद्रबिंदू होता. यावर्षीची संकल्पना होती, ‘व्हेन द माईंड  इज विदाऊट फिअर’. रवींद्रनाथांच्या जगप्रसिद्ध कवितेची ही पहिली ओळ. ‘जिथे चित्त असेल भयमुक्त’!. केवळ निधडय़ा छातीतून उमटलेले बोल करोडोंच्या हृदयांवर राज्य करू शकतात, समाज; सत्ता नव्हे – आत्मा बदलू शकतात. पण मग आज आपले मन भयमुक्त आहे का? कसली बंधनं वाटतात? व्यावसायिक दृष्टिकोनांच्या मर्यादांची? मार्केट डिमांडची? कमी पैशाची? कसली भीती आहे? कोऱ्या कागदाची? सेन्सॉरची? हे अश्लील गणले जाईल, हे या धर्माला, त्या समाजाला मान्य नसेल, याची? तीन दिवसातल्या सर्व चर्चासत्रांमधून उमटलेल्या विचारांना या संकल्पनेचा ‘कणा’ होताच होता.

प्रादेशिक चित्रपटांसमोरील आव्हाने काय आहेत, याचा ऊहापोह निखिल साने (कलर्स मराठी व्यवसाय प्रमुख, निर्माते ‘सैराट’), रवी जाधव (नटरंग, न्यूड), अभिषेक जैन (गुजराती लेखक दिगदर्शक ‘केवी रिते जईश’), मनस्विनी लता रवींद्र (‘ती सध्या काय करते’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’) या मंडळींनी केला. त्यांना बोलतं केलं, ‘एफटीआयआय’च्या व्याख्यात्या केतकी पंडित यांनी. एखाद्या चित्रपटाला घवघवीत यश मिळालं, तर ‘इंडस्ट्री’च्या घोडदौडीला वंगण मिळतं हे खरं असलं, तरी त्यामुळे त्याच छापाच्या चित्रपटांची मागणी वाढते, कलात्मकदृष्टय़ा वाढ खुंटते, यावर सगळ्यांचं एकमत झालं.

सगळंच अगदी ‘गोड गोड’ होतं असंही नाही. वादविवादांमध्ये वातावरण तापतं. ते गरजेचं पण आहे.

जे टाइमपाससाठी आलेत, त्यांच्या जेवणांनंतरच्या सुस्तीत जागृती येते, जे काहीतरी ‘घेऊन’ जाण्यासाठी आलेत, त्यांना या मंथनातून अमृतही मिळतं. अशा मंथनाची चर्चासत्रं म्हणजे दूरचित्रवाहिन्यांची. ती तर खूप रंगली. किती दिवस ‘सास बहू’ खेळणार? वाहिनीच्या कार्यालयात आपली कथा सांगायला जाणे नवोदित लेखकांना इतके अवघड का जाते?.. लेखकांचं लिखाण वाचण्यासाठी वाहिन्या ‘रिडर्स’ (कथा वाचून अभिप्राय देणारी अधिकृत व्यक्ती) का नेमत नाहीत? अशा प्रश्नांवर खडाजंगी झाली. पण हिंदी मालिका क्षेत्रातले अनुभवी लेखक आणि ‘एसडब्ल्यूए’चे जनरल सेक्रेटरी जामा हबीब (निमकी गांव की मुखिया ), शांतीभूषण (इष्क का रंग सफेद) पूर्णेन्दू शेखर (अस्तित्व, सात फेरे) यांनी त्याला योग्य दिशा दिली.

पण खऱ्या अर्थाने गीतकारांचं चर्चासत्र गाजलं. कवींच्या आंतरिक आणि बाह्य़ संघर्षांविषयी हसत खेळत गप्पा! विविध भाषिक संगीतकार, विक्षिप्त दिग्दर्शक, एकच एक शब्द ऐकणाऱ्याच्या कानावर आदळवत राहून कॅची हूक देण्याची जबरदस्त मागणी (लडकी ब्युटीफुल, कर गई ‘चूल्ल’ – यातलं ‘चूल्ल’ हे हूक आहे!) दर तीनेक मिनिटाला टाळ्या पडत होत्या! स्वानंद किरकिरे, कौसर मुनीर (आज से सारी तेरी गलियां), अभिरुची चांद (बुद्धुसा मन), शैली (ढोल यार ढोल, परदेसी) आणि वरुण ग्रोव्हर (ये मोह मोह के धागे) यांनी केवळ धमाल आणली.

परिषदेची सांगता करण्यासाठी गुलजार, जावेद सिद्दकी, रणधीर कपूर होते. या तिघांचीही भाषणे म्हणजे आठवणींची अत्तर कुपी. गुलजार कवी शैलेंद्र यांच्यावर, सिद्दीकी डॉ. राही मासूम रझांवर तर ‘रंग दे बसंती’ लेखक कमलेश पांडे हे के. ए. अब्बास यांच्यावर बोलले. जुन्या पिढीतल्या लेखकांचे गुण, अनुभव यांना समजून घेणं आजच्या लिखाणासाठी का गरजेचे आहे, याची लखलखीत जाणीव तेव्हा झाली, जेव्हा रणधीर कपूर यांनी मान्य केलं, शैलेंद्रजी नहीं होते तो राज कपूर नही होते!.. तीच महती अब्बासांची!.. राज कपूर यांनी कुटुंबासोबत जेवढा वेळ घालवला नसेल, तेवढा अब्बासांसोबत घालवला. म्हणूनच कालातीत चित्रपटांची निर्मिती झाली.

आलेल्या प्रत्येक झोळीधारी खांद्यावर जणू या भरतवाक्याची मोहर उठली आणि तो आपल्या व्यावसायिक लढायांकडे आशेने चालू लागला, यातच ‘इंडियन स्क्रीन रायटर्स कॉन्फरन्स’चं यश आहे.

मनीषा कोरडे

(लेखिका प्रसिद्ध पटकथाकार आणि ‘स्क्रीन रायटर असोसिएशन’च्या सहसचिव आहेत.)