कू्रझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. दरम्यान गुरुवारी सकाळीच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. यावेळी मुलाखत कक्षामध्ये त्याने सुमारे १८ मिनिटे इंटरकॉमद्वारे मुलाशी संवाद साधला. अमली पदार्थ प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन प्रथमच शाहरुख खानला भेटला. सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर शाहरुखला आर्थर रोड कारागृहात प्रवेश मिळाला. सकाळी सव्वानऊ वाजता आलेला शाहरुख ९.३६ ला कारागृहातून बाहेर पडला. सुरक्षेच्या कारणावरून शाहरुख येण्यापूर्वीच सर्व परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र या भेटीदरम्यान शाहरुखला आर्यनला पाहून अश्रू अनावर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी शाहरुख रडला अन् नंतर आर्यन…
पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख आणि आर्यन यांची भेट १२ क्रमांकाच्या काऊंटरवर झाली. ते इंटरकॉमच्या माध्यमातून एकमेकांशी बोलले. करोना नियमांमुळे या दोघांमध्ये काचेची भिंत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिले काही मिनिटं दोघेही नुसते एकमेकांना पाहत बसले होते. मात्र थोड्यावेळाने शाहरुखच्याच भावनांचा बांध फुटला आणि त्याला रडू आलं. आपल्या वडीलांना रडताना पाहून मग आर्यनही मोठ्याने रडू लागला. त्यानंतर तुरुंगामधील अधिकाऱ्यांनी दोघांना शांत केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

आर्यन काय म्हणाला आणि तुरुंगात काय घडलं?
आर्यनने शाहरुखला, “मला माफ करा,” असं म्हटलं. त्यावर शाहरुखने, “मला तुझ्यावर विश्वास आहे. मला सध्या फार दु:ख होतं आहे,” असं शाहरुख म्हणाला. त्यानंतर शाहरुखने तू काही खाल्लं का असं आर्यनला विचारलं. यावर आर्यनने नकारात्मक उत्तर दिल्यानंतर शाहरुखने तुरुंग अधिकाऱ्यांना आर्यनसाठी घरुन काही पाठवता येईल का अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी यासाठी तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असं सांगत त्या परवानगीशिवाय तुम्हाला आर्यनला घरचं जेवण देता येणार नाही असं म्हटलं. यानंतर शाहरुखने इतर कैद्यांकडे आर्यनची काळजी घेण्याची विनंती केली. तसेच शाहरुखने तुरुंगाबाहेर पडताना इतर कैद्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना हात जोडून अभिवादन केल्याचं पहायला मिळालं.

‘एनसीबी’चे पथक मन्नतवर
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) एक पथक  गुरुवारी अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर गेले होते. आर्यनशी संबंधित काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी  तपास अधिकारी व्ही. व्ही. सिंह  यांच्या नेतृत्वाखालील पथक  शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी गेले होते, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. आर्यनची शैक्षणिक व वैद्यकीय माहिती, तसेच आर्यनकडे दुसरा मोबाइल किंवा इतर कुठलीही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्यास ती सोपवण्याची मागणी एनसीबीने शाहरुखकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसल्याचे यावेळी एनसीबीने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan aryan khan meeting in arthur road jail srk broke in tears scsg
First published on: 22-10-2021 at 09:15 IST